उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:06 PM2024-08-16T20:06:14+5:302024-08-16T20:08:38+5:30

मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली मात्र त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीनं फारसा प्रतिसाद दिला नाही. 

Maharashtra Assembly Election 2024: Uddhav Thackeray demand of CM Face rejected by Congress-NCP Sharad Pawar; The face will be decided only after the result | उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

मुंबई - महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा. काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवारांनी नाव सांगावे मी त्याला पाठिंबा देईन असं विधान उद्धव ठाकरेंनी आजच्या मविआच्या मेळाव्यात केले. मात्र ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस राष्ट्रवादीकडून नकार घंटा दाखवण्यात आली आहे. महाविकास आघाडी हाच चेहरा असेल. निवडणुकीच्या निकालानंतर बसून चेहरा कोण हे मविआचे आमदार ठरवतील असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच हा चेहरा राहील असं आम्ही दोघांनी त्यांना सूचवलं. त्यांना ठाकरेंनी पाठिंबा द्यावा. जसं इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढलो तसेच महाविकास आघाडी म्हणून लढू. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार महाविकास आघाडीचे आणायचे त्यानंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय वरिष्ठांनी करायचा. जो काही निर्णय वरिष्ठ देतील त्यांच्या आदेशाचे पालन सर्वजण करू असं त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री आमदारांमधून निश्चित व्हावा. अजून जागावाटपावर चर्चा नाही. २१ ऑगस्टपासून जागावाटपावर चर्चा होईल. आमच्या सगळ्यांची तयारी आहे. २१ तारखेला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आज आमचे बोलणं झालं आहे त्याआधारे फॉर्म्युला ठरेल असं नाना पटोलेंनी स्पष्ट केले. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. लोकसभेतही ते सर्व महाराष्ट्रभर फिरलेत. त्यामुळे प्रचार करण्याचं काम त्यांनीच केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांनी प्रचार केला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात वाद नाही. योग्यवेळी त्याबाबतीतले निर्णय होतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राहिलेत त्यामुळे काहींच्या जागा त्या स्तरावर आहेतच असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

लाचारी किती असावी याचे ज्वलंत उदाहरण आज पाहायला मिळाले. प्रास्ताविक उद्धव ठाकरेंनी करावे त्यात येणारा मुख्यमंत्री तुम्ही सांगावे, माझ्या त्याला पाठिंबा आहे असं सांगूनही महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे या मशालीची आग स्वत:च्या बुडाला लावून घेतली की काय असं चित्र त्यातून उभं राहते. त्यामुळे आपल्याच मशालीने शिवसैनिकांचे घर जाळणारे तुम्ही आहात असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Uddhav Thackeray demand of CM Face rejected by Congress-NCP Sharad Pawar; The face will be decided only after the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.