मुंबई/नागपूर - दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा एवढी शिवसेना कमकुवत झाली नाही. सुनील केदार यांनी रामटेकमध्ये गद्दारी केली आहे हे स्पष्ट आहे. मारूतीच्या बेंबीत लपलेला विंचू हे सुनील केदार आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आणि पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सुनील केदार यांनी रामटेकचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, माझ्याकडे पूर्व विदर्भातील २८ जागांचे कार्यक्षेत्र आहे. त्या २८ जागांपैकी फक्त १ जागा आम्हाला मिळाली तिथेही काँग्रेसने त्यांचा बंडखोर उमेदवार उभा केला आहे. त्याच्या व्यासपीठावर तुम्ही जाता ही गद्दारी नाही?, तुम्ही उद्धव ठाकरेंना काय मदत करताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच सुनील केदार पाहुण्यांच्या काठीने विंचू मारण्याइतपत आम्ही कमजोर नाही. सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे हे शिवसेनेने वेळीच ओळखावं. आज मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर गार गार लागत असेल पण बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण बोंबलत येतो कारण आत बेंबीत विंचू बसलेला असतो. तो नांगी मारतो. सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे. इतका विश्वासघात कुठल्याही मित्रपक्षाने आघाडीत करू नये. हा सरळ सरळ विश्वासघात आहे असा घणाघात भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांच्यावर केला आहे.
रामटेकमध्ये काय स्थिती?
रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरेसेनेचे विशाल बरबटे हे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार हे जाहीरपणे बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे मविआतील धुसफूस उघड झाली आहे. काँग्रेसने राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई केली असली तरी स्थानिक नेते मविआ उमेदवाराचा प्रचार न करता बंडखोराला साथ देतानाचे चित्र पुढे आल्याने ठाकरे गट संतापला आहे.