पुणे - विधानसभा निवडणुकीचे वारं राज्यभरात वाहत आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत मनसे, वंचित आणि तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार जाहीर करत आहे. त्यात भाजपा, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, उद्धव ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातील एका जागेचा समावेश आहे. पुण्यात हडपसर, खडकवासला आणि पर्वती हे ३ मतदारसंघ मविआत राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत.
त्यात हडपसर येथून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात मागील निवडणुकीत मनसेकडून हडपसर विधानसभा निवडणूक लढणारे वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मनसेतील गटबाजीला कंटाळून वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोरे यांनी महाविकास आघाडीकडून तिकीटासाठी प्रयत्न केले. परंतु मविआने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी वसंत मोरे यांनी कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढणार असा चंग बांधला. पुढे जात त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. पुणे लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर वसंत मोरे यांनी लढवली.
मात्र लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत वसंत मोरेंचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे पुण्यातील खडकवासला मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र विधानसभेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडण्यात आलेला आहे. याठिकाणी मविआकडून राष्ट्रवादीचे सचिन दोडके उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत त्यामुळे या मतदारसंघात वसंत मोरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही.
पुण्यातील हडपसर, खडकवासला आणि पर्वती हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने याठिकाणी ठाकरे गटातील इच्छुकांचा हिरमोड झालेला आहे. त्यात खडकवासला येथील इच्छुक वसंत मोरे यांच्याशी लोकमत ऑनलाईननं संपर्क केला असता ते म्हणाले की, पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे महाविकास आघाडीचं काम करावे लागेल. मी इच्छुक होतो पण पक्षाला जागा मिळाली नाही तर त्याला काय करणार..महाविकास आघाडीची काहीतरी स्वत:ची गणिते असतात. त्यामुळे ३ महिन्यात मीदेखील अपेक्षा करणे योग्य नाही. मला राज्य संघटकपदाची पक्षाने जबाबदारी दिली आहे ते काम सुरूच आहे. त्यामुळे विधानसभेचं काही वाटत नाही, काही महिन्यात महापालिका निवडणुका आहेतच. दक्षिण पुण्यातील कात्रज, धनकवडी, बालाजीनगर हा माझा प्रभाग आहे असं सांगत वसंत मोरे महापालिकेच्या तयारीला लागले आहेत.