राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:21 AM2024-11-05T06:21:23+5:302024-11-05T06:44:48+5:30

Maharashtra Assembly Election 2024: प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोमवारी अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला अर्ज कायम ठेवत दंड थोपटले आहेत. राज्यात जवळपास १५७ बंडखोर रिंगणात आहेत. या बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की मतविभाजनामुळे तिसऱ्याचाच फायदा होतो, याची उत्सुकता आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Universal outbreak of rebellion in the Maharashtra Election, as many as 157 rebels in the arena, what is the situation where? | राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?

राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?

मुंबई -  प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोमवारी अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला अर्ज कायम ठेवत दंड थोपटले आहेत. राज्यात जवळपास १५७ बंडखोर रिंगणात आहेत. या बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की मतविभाजनामुळे तिसऱ्याचाच फायदा होतो, याची उत्सुकता आहे. कोणत्या बंडखोरांनी अर्ज कायम ठेवला त्याचा हा आढावा. 

अमरावतीमध्ये बंडखोरीचे दोघांनाही जोरदार धक्के
अमरावती शहरात भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांची बंडखोरी कायम आहे. तेथे अजित पवार गटाच्या आ. सुलभा खोडके महायुतीच्या उमेदवार आहेत. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख काँग्रेसचे उमेदवार आहेत. 
बाजूच्या बडनेरा मतदारसंघात भाजपचे तुषार भारतीय यांची बंडखोरी कायम आहे. तेथे आ. रवी राणा महायुतीचे उमेदवार आहेत. मविआत उद्धवसेनेच्या प्रीती बंड यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडेंविरुद्ध याच पक्षाचे प्रमोद गड्रेल कायम आहेत. मोर्शीमध्ये काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी बंडखोरी केली. ही जागा शरद पवार गटाकडे आहे. 

भाजप उमेदवाराच्या भावाचे काँग्रेसविरुद्ध बंड
सावनेर (जि. नागपूर)मध्ये आशिष देशमुख भाजपचे उमेदवार आहेत. माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या काँग्रेसकडून लढत आहेत. आशिष यांचे काँग्रेसमध्ये असलेले बंधू डॉ. अमोल यांनी केदारांविरुद्ध बंड करत उमेदवारी कायम ठेवली. कामठीतून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे लढत असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर मैदानात आहेत. तिथे काँग्रेसच्या तीन जणांनी भोयर यांच्याविरुद्ध उमेदवारी कायम ठेवली. 

माजी राज्यमंत्री मुळक यांचे बंड
महाविकास आघाडीत रामटेकची उमेदवारी उद्धवसेनेचे विशाल बरबटे यांना मिळाली. तेथे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक रिंगणात कायम आहेत. शिंदेसेनेचे आ. आशिष जयस्वाल उमेदवार आहेत. उमरेडमध्ये भाजपचे सुधीर पारवेंविरुद्ध याच पक्षाचे प्रमोद घरडे यांनी बंड केले. मात्र, माजी आमदार राजू पारवे (शिंदेसेना) यांनी माघार घेतली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गटातच सामना 
पुण्यात चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे भाऊसाहेब भोईर रिंगणात आहेत. पिंपरीमध्ये भाजपचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी अजित पवार गटाचे आ.अण्णा बनसोडे यांच्याविरुद्ध उमेदवारी कायम ठेवली. 

पाटणमध्ये बंडखोरीमुळे रंगत 
सातारच्या पाटण मतदारसंघात उद्धवसेनेचे हर्षल कदम मविआचे उमेदवार असताना शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर कायम आहेत. वाईची महायुतीची उमेदवारी मकरंद पाटील (अजित पवार गट) यांना मिळाली असताना शिंदेसेनेचे पुरुषोत्तम जाधव मैदानात टिकून आहेत.

पडळकर यांच्या अडचणीत वाढ 
सांगलीच्या जतमध्ये भाजपचे तम्मनगौडा पाटील यांची बंडखोरी कायम राहिल्याने भाजपचे गोपीचंद पडळकर यांची अडचण वाढली आहे. खानापूर-आटपाडीत शरद पवार गटाचे वैभव पाटील यांच्याविरुद्ध याच पक्षाचे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी माघार घेतली नाही. सांगलीमध्ये काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील मैदानात आहेत, तिथे पृथ्वीराज पाटील काँग्रेस उमेदवार आहेत.

कोकणातही बंडखोरीची डोकेदुखी 
- सावंतवाडीत उद्धवसेनेचे राजन तेलींविरुद्ध अर्चना घारे-परब (शरद पवार गट) तर शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याविरुद्ध भाजपचे विशाल परब मैदानात आहेत. राजापूरमध्ये काँग्रेसचे अविनाश लाड यांच्याविरुद्ध उद्धवसेनेचे राजन साळवी मैदानात उतरले आहेत. 
- पालघरच्या विक्रमगडमध्ये भाजपचे हरिश्चंद्र भोये उमेदवार असताना शिंदेसेनेचे प्रकाश निकम रिंगणात आहेत. 

सोलापुरात काय स्थिती ? : सोलापूरच्या मोहोळमध्ये शरद पवार गटाचे राजू खरे यांच्याविरुद्ध याच पक्षाचे संजय क्षीरसागर आणि काँग्रेसचे रॉकी बंगाळे रिंगणात आहेत. माजी आमदार रमेश कदम व त्यांच्या कन्येने माघार घेतली. सोलापूर शहर उत्तरमध्ये माजी राज्यमंत्री भाजपचे विजय देशमुख यांना याच पक्षाच्या बंडखोर शोभा बनशेट्टी यांनी आव्हान दिले आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे चेतन नरोटेंना शरद पवार गटाचे ताैफिक शेख यांनी आव्हान कायम ठेवले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Universal outbreak of rebellion in the Maharashtra Election, as many as 157 rebels in the arena, what is the situation where?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.