मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान झालेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस यांना जागा दाखवून घेणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले. मागच्या एक वर्षात माझ्या मराठा समाजाचा खूप तोटा झाला आहे. माझ्या समाजातील लोकांची बलिदानं गेली आहेत. मराठा आरक्षणासाठी आई-बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे. त्यांची कुटुंबं उघड्यावर पडली आहेत. लाखो लोकांवर खटले दाखल झाले आहेत. कोट्यवधी मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे. मला हे सहन होत नाही. त्यामुळे २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान गेलेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस यांना जागा दाखवून घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे बलिदान घेतलेलं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार पाडण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. आता मागे हटायचं नाही. २९ सप्टेंबरपासून उपोषण करायचं. पुन्हा सहा कोटी मराठ्यांना एकत्र आणायचं. इथे जागा पुरली नाही तर त्या हायवेवर बसायचं. पण मागे हटायचं नाही. निवडणुकीतही पाडायचं आणि उपोषणामधून आरक्षणही मिळवायचं. देवेंद्र फडणवीस यांना आता सुट्टी द्यायची नाही. त्यांचे भाजपचे जेवढे आमदार आमच्याविरोधात बोलतात, त्या सगळ्यांना पाडायचं. एकालाही निवडून द्यायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.