"विदर्भात आमची ताकद जास्त, या भागातील ९९ टक्के जागा आम्ही लढवणार’’, काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:08 PM2024-07-18T14:08:21+5:302024-07-18T14:10:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल, असा दावा काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) यांनी केला आहे.
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिलालं होतं. तसेच काँग्रेसच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली होती. काँग्रेसलाविदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, विदर्भातील अधिकाधिक जागा लढण्याचा मानस काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचदरम्यान, पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची ताकद सर्वात जास्त आहे. त्यामुळे काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल, असा दावा काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित वंजारी यांनी सांगितले की, विदर्भातील नागपूर विभागातील ५ जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे. या भागातील काँग्रेसच्या लोकसप्रतिनिधींची मतं जाणून घेण्याचं काम सध्या आमच्याकडून सुरू आहे. या भागात पक्षाची ताकद किती आहे, बूथ लेव्हलला कार्यकर्ते किती आहेत, हे जाणून घेण्याची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे सोपवली आहे. या भागात काँग्रेस पक्षाची असलेली ताकद पाहता ९९ टक्के जागा आम्हाला मिळाव्यात, अशी आग्रहाची मागणी आम्ही करणार आहोत, असे अभिजित वंजारी म्हणाले.
संपूर्ण विदर्भाबाबत विचारलं असता अभिजित वंजारी पुढे म्हणाले की, अमरावती विभागाचा मला तेवढा अभ्यास नाही. मात्र नागपूर विभागाबाबत म्हणाल तर ९९ टक्के जागा ह्या काँग्रेसने लढाव्यात, असं माझं मत आहे. तशा पद्धतीचा अहवाल मी देणार आहे. तसेच सर्व्हेमध्ये ज्या नेत्याचं नाव येईल, त्या नेत्याला पक्ष उमेदवारी देणार आहे, असे संकेतही अभिजित वंजारी यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विदर्भात जोरदार मुसंडी मारली होती. तर पूर्व विदर्भात काँग्रेसला विशेष यश मिळालं होतं. येथील ५ पैकी ४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. तर एका जागेवर भाजपाला विजय मिळाला होता.