Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भांडणामुळे एकाक्षणी तुटण्याच्या टप्प्यावर पोहोचलेली महाविकास आघाडी नंतर सावरली. काँग्रेस व उद्धवसेना यांच्यातील भांडणाचा फायदा शरद पवार यांनी उचलत जास्तीच्या जागा पदरात पाडून घेतल्या, असे बोलले जाते. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले पटोले म्हणतात, आता राऊतांशी कोणताही वाद नाही. आघाडी एकजूट आहे. बेरोजगारीवर हे सरकार बोलत नाही, पण आम्ही उद्योग, रोजगारनिर्मिती याबाबत सोल्युशनसह जनतेसमोर जात आहोत. नागपूर 'लोकमत'चे संपादक श्रीमंत माने यांनी पटोले यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करायला नको अशी भूमिका दोन्ही काँग्रेसनी घेतली. परंतु, काँग्रेसमधून तुमचा चेहरा पुढे केला जातोय, हा विरोधाभास नाही का? उत्तर : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करूनच निवडणुकीला सामोरे जायला हवे, अशी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. आम्ही मात्र असे नको म्हणत होतो. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत अंतिमत: चेहरा निश्चित करण्याची गरज नाही असे ठरले. स्वत: उद्धव ठाकरे हेदेखील त्या गोष्टीशी सहमत झाले. या पृष्ठभूमीवर, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपला नेता भावी मुख्यमंत्री व्हावा असे कार्यकर्ते बोलत असतील तर ते चालतच राहणार. परंतु, मु्ख्यमंत्रिपद हे आमचे लक्ष्य नाही. मुख्यमंत्री कोण हा विचार सध्या नाही. महाराष्ट्राचे पुरोगामित्व वाचविणे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या वैचारिक वारशाला या सरकारने कलंकित केले आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांनादेखील या सरकारने अपमानित केले. असे कलंक असलेले महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेवरून घालविणे, हेच मविआचे लक्ष्य आहे.
प्रश्न : तुमचा व संजय राऊत यांचा नेमका वाद काय होता? तुम्हा दोघांच्या भांडणामुळे महाविकास आघाडीचे नुकसान झाले असे वाटत नाही का?उत्तर : ही सगळी जागावाटपाची बोलणी व प्रक्रिया होती. आम्हा दोघांचा काही वैयक्तिक वाद नव्हता. आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात, ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना समजून घेऊन आम्ही आपापली बाजू मांडत होतो. कार्यकर्त्यांना असे वाटण्यात चुकीचे काहीही नाही. काही ठिकाणी दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्यामुळे जागावाटपात पेच निर्माण झाला होता. ते जे काही पेच होते ते आम्ही चर्चेतून, मेरिटच्या आधारे सोडविले. आता काही वाद नाही. आम्ही एकजुटीने प्रचाराला लागलो आहोत.
प्रश्न : बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रचार करताना तुम्ही केवळ महायुती सरकारवर ते गुजरातधार्जिणे असल्याचा आरोप करता, तर महाविकास आघाडीच्या काळातच उद्योग व रोजगारनिर्मितीत महाराष्ट्राची पीछेहाट झाली, असा आरोप महायुती करते. हा ब्लेमगेम कशासाठी? उत्तर : महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातला विकला हे केवळ आरोपासाठी आम्ही बोलत नाही. उद्योग, रोजगारनिर्मिती याबाबत सोल्यूशनसह आम्ही जनतेसमोर जात आहोत. वस्तुस्थिती मतदारांसमोर मांडत आहोत. बेरोजगारीच्या समस्येवर आमच्याकडे उत्तरही आहे. एमपीएससीच्या माध्यमातून युवकांना नोकऱ्या देण्याचा, पवित्र पोर्टलमधून होणारी लूट थांबविण्याचा शब्द आम्ही मतदारांना देत आहोत. छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविणे व वाचविणे हे आमचे ध्येय आहे. छत्रपतींच्या स्वप्नातील शेतकरी आम्हाला जपायचा आहे. त्यांच्याच स्वप्नातील सुरक्षा महिलांना द्यायची आहे. आम्ही महिलांना महालक्ष्मी बनविणार आहोत. त्यांना दीड-दोन हजार त्यांच्या हातावर टेकवून आम्ही थांबणार नाही. त्यासोबत महिलांना सन्मान द्यायचा, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारायची, महिला-मुली सुरक्षित राहतील हे पाहायचे. अगदी दोन-चार वर्षांच्या मुलीदेखील राज्यात सुरक्षित नाहीत. ड्रग्ज माफियांनी उच्छाद मांडला आहे. हे चित्र बदलायचे आहे. आताच्या सारखे लुटारू नव्हे तर प्रामाणिक सरकार द्यायचे आहे.
प्रश्न : अशा मूलभूत समस्यांऐवजी आरक्षणासारखे मुद्दे अधिक चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रणकंदन माजले आहे आणि काँग्रेस पक्ष मराठा-ओबीसी वादात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी, दुटप्पी भूमिका घेतो, असे दिसून आले आहे. उत्तर : मराठा-ओबीसी वादात आम्ही दुटप्पी भूमिका घेतो हे खरे नाही. याबाबत आमची भूमिका वेगळी व व्यापक आहे. आधी जातनिहाय गणना व्हायला हवी. राहुल गांधी हीच भूमिका मांडत आहेत. येत्या सहा तारखेला मुंबईत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राहुलजी गॅरंटी जाहीर करतील. तेव्हा याच भूमिकेचा पुनरूच्चार केला जाईल. जेणेकरून प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येईल आणि त्यातून प्रत्येकाचे आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण स्पष्ट होईल. कोणत्या जातींना अधिक मागास आहेत हे कळेल. अगदी ओबीसींमधील काही जाती अजूनही अतिमागास आहेत. त्यांचा विचार करावा लागेल. म्हणून आम्हाला नुसती जनगणना नको आहे. गणना तर जंगलातील पशुपक्ष्यांचीही होते. तशी गणना नव्हे तर आम्ही जातगणना करणार आहोत.
प्रश्न : इतके सगळे स्पष्ट आहे तर मग सीईसी बैठकीत राहुल गांधी महाराष्ट्रातील नेत्यांवर का रागावले होते?उत्तर : समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषत: वंचित घटकांना नेतृत्वाची संधी मिळावी, अशी राहुलजींचे म्हणणे होते. माझीही हीच भूमिका आहे. यावेळी अनेक ठिकाणी तशी संधी देणे शक्य झालेले नाही. म्हणून सरकार आल्यानंतर अशा वंचित समाजाला विविध स्तरावर नेतृत्वाची संधी देणार आहोत. त्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाणार आहे.
प्रश्न : काँग्रेस व उद्धवसेना आपसात भांडत राहिली आणि त्याचा लाभ शरद पवारांनी घेतला. काँग्रेसच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या आणि पवार गटाने प्रमाणापेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या, असे झाले का? उत्तर : असे काहीही घडलेले नाही. काँग्रेस व उद्धवसेनेचे भांडण वगैरे काही नव्हते आणि त्याचा लाभ शरद पवारांनी उचलला हेदेखील खरे नाही. तिन्ही प्रमुख पक्ष तसेच मित्रपक्षांना दिलेल्या जागांचे संपूर्ण वाटत मेरिटवर, उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेवर झालेले आहे.