२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू झाली होती. तेव्हापासून मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरणं, फोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असं सातत्याने म्हटलं जातंय. दरम्यान, राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली आहे.
राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? असा प्रश्न आज एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, ''शरद पवार , कारण याची सुरुवात त्यांनी १९७८ मध्ये केली नसती तर हा उद्योग कुणाला सुचला नसता. जे १९७८ मध्ये त्यांनी केलं. १९९२ मध्ये त्यांनी केलं. नारायण राणेंच्या वेळी त्यांनी केलं. नारायण राणे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते. ते बाहेर पडल्यावर शरद पवार यांनी हात वर केले. म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले, असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलंय'', असा दावा राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना तुम्ही विचारा की, तुमचं जर चार भिंतींच्या आड काही बोलणं झालं असेल तर ते तेव्हाच का नाही सांगितले. अमित शाह म्हणतात की, मी असं बोललोच नाही. माझा उद्धव ठाकरे आणि अमित शाह दोघांवरही विश्वास नाही. तुम्ही युतीमध्ये होता. एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी बहुमत दिलं. तुमचे सुमारे १६० आमदार निवडून आले. त्यानंतर तुम्ही सांगता की, आता यांनी आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. ते म्हणतात आम्ही असा शब्द दिलेलाच नाही. ज्यावेळी पंतप्रधान तुमच्यासमोर येऊन आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे हे सांगत होते, तेव्हाच तुम्ही आक्षेप का नाही घेतलात. त्याचवेळी अमित शाह यांनी दिलेल्या वचनाची चर्चा का सुरू झाली नाही. ज्यावेळी आमच्याशिवाय सरकार बनू शकत नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाली. त्यावेळी त्यांनी ही चर्चा सुरू केली. याला भूमिका बदलणं म्हणतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.