महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरून मविआ आणि महायुतीत नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अशातच अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या अजित पवार यांनी महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण होते हे सांगितले आहे. एका मुलाखतीत अजितदादांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी विलासराव देशमुख सर्वांत चांगले मुख्यमंत्री होते, असे म्हटले आहे.
माझ्यावर अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याचा प्रसंग आला ही वस्तुस्थिती आहे. आपण गेल्या काही काळापासून युती-आघाडीच्या राजकारणाच्या युगात आहोत. देशात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असण्याची शक्यता नसते. विलासराव देशमुखांनी आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची चांगली रणनिती तयार केली होती. यामुळे ते माझ्या मतानुसार सर्वोत्कृष्ट सीएम होते, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात का या प्रश्नावर अजित पवारांनी आपण शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. परंतू, निकालानंतर महायुती विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर निर्णय होईल असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना अजित पवारांनी तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, असे सांगितले. महायुतीच कामे करू शकते, हे लोकांना आता पटलेले आहे. लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे घटक, विशेषतः (आरक्षणाचा मुद्दा) बदलले आहेत, ज्यामुळे महायुतीची कामगिरी सुधारण्यास मदत होईल. महायुती १७५ जागा जिंकेल असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. काका-पुतण्याच्या लढाईवर अजित पवारांनी बोलण्यास नकार दिला.
तसेच भाजपसोबत सरकार बनविण्याच्या बैठकांमध्ये अदानींच्या उपस्थितीच्या दाव्यावर अजित पवारांनी अदानींच्या घरी बैठक झाली पण अदानी तिथे नव्हते असा युटर्न घेतला होता. यावर अजित पवारांनी हा युटर्न नाही, मी आणि प्रफुल्ल पटेल काही बैठकांना हजर होतो असे सांगितले. तसेच शरद पवार उद्योजकांना भेटतात या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.