मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले, याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले.
न्या. आरिफ डॉक्टर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला ज्या उमेदवारांचे अर्ज ३० ऑक्टोबरला सकाळी ११ नंतर नाकारण्यात आले त्यांची यादी सादर करण्याचे निर्देशही दिले. ३० ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी सकाळी ११ नंतर अर्ज दाखल केल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. त्याविरोधात संबंधित उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने कोणते प्रश्न उपस्थित केले? सकाळी ११ नंतर दाखल केलेले प्रत्येक अर्ज नाकारण्याच्या निर्णयाबद्दल निवडणूक आयोगाकडे उच्च न्यायालयाने विचारणा केली. कामकाजाची वेळ ११ वाजल्यापासून सुरू होत असताना ११ वाजता अंतिम मुदत कशी काय ठेवली? अंतिम मुदत १२ किंवा १ वाजता का नाही ठेवली? कशाच्या आधारावर ११ वाजता अंतिम मुदत ठेवली? अशी विचारणा न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काय?सकाळी ११ नंतर अर्ज भरल्यामुळे निवडणूक अधिकारी अर्ज फेटाळू शकत नाही. कामकाजाच्या तासांच्या आत अर्ज भरले जाणे आवश्यक आहे. सकाळी ११ वाजता अंतिम मुदत निश्चित करण्यास कोणताही आधार नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.निवडणूक आयुक्तांनी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशितपत्रांची छाननी सुरू करण्याचा स्थायी आदेश दिला होता. त्यामुळे मुदतीबाहेर दाखल करण्यात आलेले अर्ज नाकारण्यात आले, असा युक्तिवाद निवडणूक आयोगातर्फे ऍड. अक्षय शिंदे यांनी न्यायालयात केला.