पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 04:27 PM2024-11-02T16:27:48+5:302024-11-02T16:29:28+5:30
दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्रित येण्याची परंपरा आहे. मात्र पाडव्याला आज अजित पवार काटेवाडीत आणि शरद पवार गोविंद बागेत कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारत होते. आता भाऊबीजेला अजितदादा सुप्रिया सुळे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे.
पुणे - भाऊबीज उद्या, एकत्रित साजरी होईल का उद्या बघूया. कुटुंबा कुटुंबात आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो. गेली ३५ वर्ष अजितदादा बारामतीला कुटुंबासारखं सांभाळले आहे. बारामतीकरांना दादांचे काम माहिती आहे. नक्कीच विजयाचा विश्वास आहे. काटेवाडीत आज इतक्या मोठ्या संख्यने अजितदादांना भेटायला लोक आलेत. त्यांना सदिच्छा देतायेत. राजकारण राजकारणाच्या जागी, नातं नात्याच्या जागी असं सांगत खासदार सूनेत्रा पवारांनी पवार कुटुंबातील राजकीय मतभेदावर भाष्य केले आहे.
दिवाळी पाडवानिमित्त आज बारामतीत गोविंद बाग आणि काटेवाडी याठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात अजित पवारांना भेटण्यासाठी येणारे काटेवाडीत जात होते तर शरद पवारांच्या भेटीसाठी येणारा गोविंदबागेत जात असल्याचं चित्र समोर आले. यावेळी सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना मुलाखत दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मी अनेकदा या प्रश्नाचं उत्तर दिले आहे. नाते नात्याच्या जागीच राहणार आहे. राजकारण, विचारभिन्नता असते. भाऊबीजेला एकत्रित येणार का हे उद्या बोलू. अजितदादा जाऊ शकतात असं विधान त्यांनी केले आहे.
तसेच काटेवाडीत सकाळपासून कार्यकर्त्यांची रिघ आहे. राज्यभरातून कार्यकर्ते अजितदादांना शुभेच्छा द्यायला येतायेत. पूर्वीपासून काटेवाडीत लोक दिवाळी शुभेच्छा द्यायला यायचे. त्यानंतर साहेब गोविंदबागेत गेल्यानंतर तिथे सुरू झाले. ज्या ज्या लोकांना भेटायचे असते ते दिवाळीत शुभेच्छा द्यायला येतात असं खासदार सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.
पवार कुटुंब एकत्रित येणार?
दरवर्षी भाऊबीजेनिमित्त पवार कुटुंब एकत्रित आल्याचं पाहायला मिळते, काटेवाडी येथे हा कार्यक्रम होतो. मागील वर्षी पक्षात फूट पडूनही अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले होते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंब भाऊबीजेला एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यात बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या चिरंजीवाला शरद पवारांनी रिंगणात उतरवलं आहे. त्यात अजित पवारविरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे.