लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि महायुतीची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग सुरू झालं आहे. आधी कोल्हापूरमध्ये समरजितसिंह घाटगे आणि नंत इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकत तुतारी हाती घेतल्यानंतर आता भाजपाचा पुण्यातील आणखी एक बडा नेता शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला पुण्यामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
भाजपाचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय काकडे हे रविवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मंगळवारी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असं वृत्त आहे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपामध्ये माझ्यासाठी काही कामच राहिलेलं नाही. केवळ बसून गंमत बघत राहायची हे माझ्या रक्तात नाही. माझ्याकडे भाजपाचं प्रदेश उपाध्यक्षपद आहे. मात्र मंगळवारी मी या पदाचा राजीनामा देणार आहे. येथे काही कामच नाहीये. बसून पगार घेऊ नये असं म्हणतात. तसंच बसून पदाची अपेक्षाची ठेवू नये आणि पदही मागू नये, अशा शब्दात संजय काकडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, संजय काकडेंचा फोन अजून लागलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशावरील चर्चांना उत्तर देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.