Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहे. या सभांमधून शरद पवार राष्ट्रवादीतून बंड केलेल्या आमदारांविरोधात रोखठोक भूमिका मांडत आहेत. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत शरद पवार हे जाहीरपणे त्यांना पाडण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे आता बारामतीमध्येअजित पवार यांनाही पाडा असं आवाहन शरद पवार करणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र शरद पवार यांनी त्यांच्या भूमिकेबाबत आता भाष्य केलं आहे.
बारामतीमधल्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होणार आहे. युगेंद्र पवार यांच्या समर्थनासाठी सुरुवातीचे काही दिवस शरद पवार हे बारामतीमध्ये तळ ठोकून होते. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ पाडा असं आवाहन शरद पवार यांनी केले आहे. अशातच आता त्यांनी अजित पवारांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांना तुम्ही अजित पवारांबाबत बोलत नाहीत असा सवाल विचारण्यात आला होता. "अजून मी बारामतीला गेलेलो नाही. परवा मी बारामतीला जाणार आहे. तिथं मी काय बोलणार हे आता तुम्हाला सांगणार नाही. दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोघेही माझ्या पक्षाच्या तिकिटावर माझ्या फोटोसह भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आले होते. जनतेने त्यांना भाजपच्याविरोधात मत देऊन निवडून आणलं होतं. पण त्यांनी धोकाधडी केली आणि ते भाजपसोबत गेले. ज्यांच्याविरोधात आम्ही मतं मागितली त्यांच्यासोबत हे सत्तेत असल्यामुळे मी बोललो आहे. कारण लोकांच्या सोबत त्यांनी धोका केला," असं शरद पवार यांनी म्हटलं.
यावेळी पंतप्रधान मोदी तुमच्यावर टीका करत नसल्याच्या बाबतही पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मोदी माझ्यावर टीका करत नाहीत हीच माझ्यासाठी चिंतेची बाब आहे, असं शरद पवार म्हणाले. मोदी माझ्यावर टीका करत नाहीत ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या निवडणुकीत ज्या ज्या वेळी मोदी आले त्यावेळी माझ्यावर टीका केली आणि आमच्या जागा वाढल्या. म्हणूनच मी त्यांना निमंत्रण दिले की, मोदीजी महाराष्ट्रात या आणि तुमच्या मन की बात बोला. त्यामुळे आमच्या जागा वाढतील. पण त्यांच्या सल्लागाराने सांगितले असावं की शरद पवारांना महाराष्ट्रात भाष्य करू नका. माझ्यावर बोलणे बंद आहे. पण राहुल गांधी आणि इतर नेत्यांवर टीका करणं सुरुच आहे. जसं प्रधानमंत्रीपदाचा सन्मान आम्ही ठेवला पाहिजे, तसचं विरोधी पक्षनेता पदाचा मान त्यांनी ठेवला पाहिजे. मोदी येतात आणि राहुल गांधींवर टीका करतात. हे लोकांना आवडत नाही," असं शरद पवार म्हणाले.