शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 07:44 PM2024-11-24T19:44:10+5:302024-11-24T19:45:14+5:30
maharashtra assembly election : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण असावा? यासंदर्भात सर्वसामान्यांमध्येही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते...
महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीत महायुतीला अतिप्रचंड बहुमत मिळाले आहे. यानंतर आता मुख्यमत्री पदाचीही चर्चा होऊ लागली आहे. महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांंतील नेते आपापली इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. याशिवाय, राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण असावा? यासंदर्भात सर्वसामान्यांमध्येही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
संजय राऊतसारखं बोलायला लागलो, तर... -
यावेळी, शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षाचा दावा असणार आहे का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, "बघा, मी फार छोटा मानुष्य आहे. संजय राऊतसारखं बोलायला लागलो, तर लोक मलासुद्धा तसेच मानून चालले असते. मी एक जबाबदार प्रवक्ता आहे आणि त्यामुळे जबाबदारीने बोलेन एवढे मी सांगतो," असे दीपक केसरकर म्हणाले.
केसरकर पुढे म्हणाले, "ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली आणि फार चांगला निकाल आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने तर आम्ही नेहमीच विचार करतो की, त्यांना पहिले प्राधान्य द्यायला हवे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहे.
या जोडीला देवाचाही आशीर्वाद -
ही दोघांची जोडी आहे. हे बघा, या जोडीने काय चमत्कार करून दाखवला. अजित दादा नंतर सहभागी झाले. त्यामुळे अजित दादांनाही याचे क्रेडिट आहे. पण हे दोघे पहिल्यापासूनच सोबत चालत आहेत. ही जोडी कायम राहील आणि त्यांना देवाचाही आशीर्वाद आहे.