- धनंजय वाखारेनाशिक - विधानसभेचे उपाध्यक्ष व पेठ-दिंडोरी मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना यंदाच्या निवडणुकीत आपल्याच माणसाशी अर्थात शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांच्याशी कडवी लढत द्यावी लागणार आहे.
पेठ-दिंडोरी विधानसभा मतदारसंघात यंदा १३ उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरा सामना हा नरहरी झिरवाळ आणि सुनीता चारोस्कर यांच्यातच आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह सुशीला चारोस्कर व संतोष रेहरे हे शरद पवार गटातील बंडखोर अपक्ष उमेदवार यांची मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणेदेखिल औत्सुक्याचे ठरेल. झिरवाळ यांनी निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणासह पेसा भरतीसाठी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारलेली उडी व शिंदेसेनेचे धनराज महाले यांनी ऐनवेळी घेतलेली माघार हे दोन मुद्दे झिरवाळांना कितपत तारतात, याची उत्सुकता असेल. ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्देपेठ-दिंडोरी मतदारसंघात आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आजवर आलेले अपयश. दिंडोरी तालुक्यात तीन एमआयडीसी उभ्या राहत असताना पेठ तालुक्यात मात्र एमआयडीसी मंजूर होऊनही त्याबाबत प्रत्यक्षात कृती होऊ शकलेली नाही. त्यामुळे येथे बेरोजगारीचा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो.
मतदारसंघातील रस्त्यांची अतिशय दयनीय स्थिती झालेली आहे. याचबरोबर सिंचनाच्या सुविधांचाही प्रश्न नेहमीच प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे. पेसा भरतीप्रश्नी शिंदे सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी सदर भरती ही मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात असल्याने हा मुद्दाही प्रचारात प्रभावी ठरू शकतो.