काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 07:52 PM2024-11-02T19:52:17+5:302024-11-02T19:55:21+5:30

भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणाऱ्या या ७६ जागा राज्यातील पुढील सरकार स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

Maharashtra Assembly Election 76 seats contested between BJP and Congress will play an important role in the formation of the next government | काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा

काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ७६ जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. दोन्ही पक्ष अनुक्रमे सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी आघाडीचे नेतृत्व करत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये ६६ जागांवर लढत झाली होती, त्यापैकी काँग्रेसने १६ तर भाजपने ५० जागा जिंकल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे या ७६ जागांपैकी ३६ विदर्भातील कापूस पट्ट्यातील आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणाऱ्या या ७६ जागा राज्यातील पुढील सरकार स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये असलेला भाजप १४८ जागा लढवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ८० उमेदवार उभे केले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ५२ उमेदवार उभे केले आहेत. भाजपने सर्वाधिक ४७ उमेदवार विदर्भात, त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात ३२, उत्तर महाराष्ट्रात १७, मराठवाड्यात १९ आणि कोकण, ठाणे आणि मुंबईमध्ये ३३ उमेदवार उभे केले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०२ जागा लढवत आहे. तर शिवसेनाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९६ आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी ८७ जागा लढणार  आहे. उर्वरित जागा छोट्या मित्रपक्षांना गेल्या आहेत. अशातच भाजपा विरुद्ध ठाकरे गट अशी लढत ३० जागांवर होणार आहे. तर भाजपा विरुद्ध शरद पवार गट अशी लढत ३९ जागांवर होणार आहे. शिरपूर, डहाणू आणि पनवेल या तीन मतदारसंघात भाजप अनुक्रमे सीपीआय, सीपीआय(एम) आणि पीडब्ल्यूपीआय विरुद्ध लढणार आहे.

मात्र सर्वात मोठी लढत काँग्रेस आणि भाजपच्या ७६ जागांवर होणार आहे. ३६ जागा असलेल्या विदर्भाचा कापूस पट्ट्यातील उमेदवार कसे मतदान करतील, यावर काँग्रेस आणि भाजपचे भवितव्य अवलंबून राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील ३६ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजही या भागांमध्ये निवडणूक लढवणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिममधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्या विरोधात तर बावनकुळे काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्या विरोधात लढणार आहेत. नाना पटोळे यांची साकोलीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी लढत होणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेस विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी मतदारसंघातून भाजपच्या कृष्णलाल सहारे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. चंद्रपूरमधून लोकसभेची जागा गमावल्यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आपली बल्लारपूरची जागा राखण्यासाठी काँग्रेसचे संतोष रावत यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

अशातच प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते ही दोन महत्त्वाची पदे पटोले आणि वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्याच्या निर्णयावरून विदर्भ पुन्हा ताब्यात घेण्याचा काँग्रेसचा निर्धार दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान विदर्भात सर्वाधिक पसंती मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाने विदर्भातील १० पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी १४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ २८ जागांवरच विजय मिळवता आला.

कापूस पट्ट्यावर आपली पकड पुन्हा मिळवणे हे अवघड काम आहे हे भाजप नेतृत्वाला माहीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप १२२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी विदर्भातून भाजपने ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या. मात्र २०१९ मध्ये ही संख्या २९ जागांवर आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आक्रमकतेने जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मैदानात उतरल्याने भाजपला विश्वास आहे की ते विदर्भात अधिक मजबूत होतील. इतर मागासवर्गीय मतदारांना एकत्रित करण्यापासून ते दलितांना खूश करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत, पक्षाने २८८ जागांवर विभागनिहाय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक टीम देखील तैनात केली आहे.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात ३१ जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली होती. ज्यामध्ये काँग्रेसने आठ तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. विदर्भात लोकसभेची जादू पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस आपल्या दलित, मुस्लिम आणि कुणबी व्होटबँकेवर लक्ष केंद्रित करत आहे. “बेरोजगारीमुळे केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. गंमत म्हणजे, सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी फारच थोडे केले आहे,” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 76 seats contested between BJP and Congress will play an important role in the formation of the next government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.