मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:23 PM2024-11-07T23:23:43+5:302024-11-08T08:02:48+5:30
Supriya Sule Interview: लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या.
राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानानुसार एबी फॉर्मवर फक्त अध्यक्ष आणि शरद पवारांची सही चालते. कार्यकारी अध्यक्षांची चालत नाही. अजित पवारांचा हा पक्ष नाही, तो शरद पवारांचा आहे. कायदेशीर प्रक्रियेमुळे तो त्यांच्याकडे दिला आहे, हे कोर्टानेही सांगितले आहे. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी अजित पवारांना जाहिराती प्रसिद्ध करण्यास सांगितल्याचे, सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच आता आपल्याला हा पक्ष नको आणि चिन्हही नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी घटना आहे तीच राष्ट्रवादीची आहे. यामुळे कार्यकारी अध्यक्षांच्या सहीने एबी फॉर्म दिले तर ते चालतील का, याचा खटल्यात अंतर्भाव करणार का या प्रश्नावर मला तो पक्ष आणि चिन्ह नको. त्यांना लखलाभो. आम्ही शून्यातून पक्ष सुरु केला. परंतू जो अन्याय उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर झाला तो देशात इतर कोणावर व्हायला नको म्हणून लढत आहे, असे सुप्रिय सुळे यांनी सांगितले.
तसेच ३० जूनच्या कथित बैठकीचा उल्लेख करताना त्यांनी आपल्याला याची कल्पना नव्हती असे सांगितले. ३० जूनला अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीचा एकही पुरावा निवडणूक आयोगाकडे, न्यायालयात अजित पवारांनी दिलेला नाही. या बैठकीला मला बोलविले नाही, मी खासदार म्हणून काहीतरी भूमिका घेतली असती ना, पण मला माहितीच नाही. आम्हाला शरद पवारांना अध्यक्षपदावरून काढल्याची जेव्हा जुलैमध्ये नोटीस आली तेव्हा समजले. ही मिटिंग कधी झाली, कुठे झाली, झूमवर झाली तर त्याचा फोटो तरी लागेल ना, असा सवाल सुळे यांनी केला.
राष्ट्रवादीत सुळे, जयंत पाटील, आव्हाड आणि अजित पवार, धनंजय मुंडे व इतरांचा दुसरा गट असे बोलले जायचे, तेव्हाच तुम्हाला लक्षात आले नाही का, या सवालावर सुळे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावेळची गोष्ट सांगितली. शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा एक-दोन लोक सोडले तर इतरांचा पवारांनी राजीनामा देण्याला विरोध होता. ही मे मधील घटना मग पुढच्या ३०-४५ दिवसांत असे काय झाले की हे लोक म्हणू लागले की पवारांनी राजीनामा द्यावा, हे मला न पटल्यासारखे आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच सत्तेतच बसले पाहिजे ही काही मक्तेदारी नाहीय. विकास विकास म्हणतात पण एखादी बिल्डिंग बांधली म्हणजे होत नाही. तो तर बिल्डरपण बांधू शकतो. यामुळे हे लोक कशासाठी तिकडे गेले हा त्यांचा युक्तीवाद मला तरी पटत नाही, असे सुळे म्हणाल्या.
एक दोघांच्या विरोधावरून सुळे यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी जर मला वाटेल तेव्हा मी सांगेन. आता ही सांगण्याची वेळ नाही, असे त्या म्हणाल्या. माझ्या आईनंतर सुषमा स्वराजांनी माझ्यावर संसदेत संस्कार केले. त्या मर्यादा पुरुषोत्तम राम असे म्हणायच्या. यामुळे मर्यादा पाळलीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
अजित पवारांच्या व्हिलन केल्याच्या आरोपांवरही २०१९ ते २०२३ पर्यंत मी एकटीच व्यक्ती आहे जे अजित पवार आणि त्यांच्या आजुबाजुचे बोलले व शरद पवार बोलले यांची माहिती आहे. या गोष्टी पोटातच राहिलेल्या चांगल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. अजित पवारांनी आरआर पाटील यांनी सही केल्यावरील दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, हा पैसा तुमचा नाही की माझा नाही. हा जनतेचा पैसा आहे त्यामुळे यावर व्हाईट पेपर यावा हा चांगला पर्याय आहे. हा अहवाल आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पहिला आरोप केला. तेच सत्तेत आले आणि त्यांनीच ती सही असलेली फाईल दाखविली, असे सुळे म्हणाल्या.