Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हा अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यात लागला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांनी पराभूत केलं आहे. त्यानंतर थोरात यांचे भाचे असलेल्या सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. मात्र भेटीनंतर सत्यजित तांबे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले अमोल खताळ हे विजयी झाले. आठ वेळा आमदार राहिलेल्या थोरात यांना पराभूत करुन अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत. बाळासाहेब थोरातांच्या पराभवाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर दुःख व्यक्त केल्याचे तांबेंनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना संगमनेरचा निकाल धक्कादायक लागला आहे. ४० वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल ते का केलं असेल? असा सवाल सत्यजित तांबे यांनी विचारला. तसेच अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे दुःख व्यक्त केल्याचेही तांबे म्हणाले.
"अजितदादांनी मला विशेष करून विचारलं की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला? काय कारणे असावेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विशेष दुःखही व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा सीनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा हे सर्व वरिष्ठ नेत्यांना गरजेचा होता," असं तांबेंनी म्हटलं
यावेळी अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेलाही सत्यजित तांबे यांनी प्रत्युत्तर दिलं. "जे टिंगल करत आहेत त्यांनी वरिष्ठांनी केलेलं काम दुर्लक्षित करु शकत नाहीत. खुनशी विचार कुणाच्या मनात असू नयेत. जर अशोक चव्हाण असा विचार करत असतील तर चुकीच आहे. राजकारणी माणूस विसराळू असायला हवा. खुनशी विचार मनात ठेऊन उपयोग नाही," असेही सत्यजीत तांबे म्हणाले.
दरम्यान, संगमनेर विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांना एक लाख १२ हजार ३८६, तर थोरात यांना एक लाख एक हजार ८२६ मते मिळाली आहेत. त्यामुळे जायंट किलर ठरलेले अमोल खताळ १० हजार ५६० मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मतदार संघात एकहाती वर्चस्व राहिले होते.