सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:36 AM2024-11-24T05:36:33+5:302024-11-24T05:38:42+5:30

Vidhan Sabha Election Result 2024: महायुतीच्या विजयाचा स्ट्राइक रेट ७४.७९ टक्के, निकालाने मविआच्या स्वप्नांवर पाणी फेरले 

Maharashtra Assembly Election Result 2024: All poll predictions turned out to be wrong, Mahayuti wins, Mahavikas Aghadi suffers a big blow | सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय प्राप्त करत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले आहे. २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या.  महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. काँग्रेस १६, उद्धवसेनेला २० तर शरद पवार गटाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे.  तिन्ही पक्षांचे मिळून राज्याचा गतिमान विकास करणारे सरकार आम्ही देऊ, अशी ग्वाही महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राला दिली आहे.

२०१४ मध्ये स्वबळावर लढताना १२२, तर २०१९ मध्ये शिवसेनेशी युतीत लढताना १०५ जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी महायुतीत लहान मित्रपक्षांसह १५२ जागा लढल्या आणि १३७ जिंकल्या. ९० टक्के जागा जिंकण्याचा विक्रम भाजपने केला आहे. शिंदेसेनेने ८७ जागा लढविल्या आणि ५८ जिंकल्या. त्यांचा स्ट्राइक रेट ६६.६६ इतका आहे. अजित पवार गटाने ६० पैकी ४१ जागा जिंकल्या. त्यांनी ६८.३३ टक्के जागा जिंकल्या. महायुतीच्या विजयाचा स्ट्राइक रेट ७४.७९ टक्के आहे. मविआला केवळ १७.०८ टक्के इतक्याच जागा मिळाल्या.

सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरवत महायुतीने दणदणीत यश संपादन करताना मविआतील कोणत्या एका पक्षाला विरोधी पक्षनेतेपददेखील मिळणार नाही अशी अवस्था केली आहे.  त्यासाठी एकूण आमदार संख्येच्या दहा टक्के संख्याबळ लागते. २८८ सदस्यांच्या विधानसभेत मविआतील कोणत्याही पक्षाला २९चा आकडा गाठता आला नाही. लोकसभा निवडणुकीत जोरदार यश मिळविलेली मविआ यावेळी कशीबशी पन्नाशीच्या जवळ पोहोचली आहे.

महायुती सरकारमधील निवडणूक लढलेले सर्व मंत्री जिंकले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांचा त्यात समावेश आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोलेंना महायुतीचा शह

२०१९ मधील मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार, त्यावेळी मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महायुतीने तडाखा दिला. आम्हीच सत्तेत येणार असे हे नेते दावा करत होते आणि मविआमधून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत दावे-प्रतिदावे करत होते. निकालाने मविआच्या स्वप्नांवर पाणी फेरले. मतमोजणीच्या पहिल्या तासापासून घेतलेली आघाडी महायुतीने वाढवत नेली आणि मविआ शेवटपर्यंत माघारलेलीच राहिली.

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: All poll predictions turned out to be wrong, Mahayuti wins, Mahavikas Aghadi suffers a big blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.