मुंबई - लोकसभेला पार कोमेजलेले कमळ विधानसभेला असे काही फुलले की पंजा, मशाल आणि तुतारीला धक्क्यामागून धक्के बसले. भाजपचे कार्यकर्ते पाच महिन्यांपूर्वीच्या दणक्याने पार नाऊमेद झालेले होते. आता विधानसभेला आपले काहीच खरे नाही अशा भीतीने त्यांना ग्रासले होते. मात्र शनिवारच्या निकालाने कमळ फुलले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची संपूर्ण यंत्रणा अत्यंत गतिमान केली. त्यांनी राज्य पालथे घातले. लोकसभेच्या निकालाने आलेली निराशा झटकण्याचे काम सुरु झाले. ग भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातून प्रभावी नेत्यांची कुमक जिल्ह्याजिल्ह्यात गेली आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज्ड् करणे सुरू झाले.
मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री करण्यात आलेले आणि नंतर त्यातही वाटेकरी आणले गेलेले देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि रा.स्व.संघाच्या शीर्ष नेतृत्वाने सांगितले. फडणवीसांनी पद्धतशीरपणे नियोजन सुरु केले. त्यातच हरियाणात अशक्यप्राय वाटणारा विजय मिळाला. हरियाणात आपण जिंकू शकतो तर महाराष्ट्रात का नाही अशी चेतना कार्यकर्त्यांमध्ये टाकली गेली, त्याने उत्साह वाढला. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांच्या लाभार्थींपर्यंत भाजपचे हजारो कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी मतदानासाठी आवाहन केले. पक्षाचे जेवढे सेल, आघाड्या आहेत त्याचे प्रमुख पदाधिकारी हे गेले दोन महिने घरीच गेले नाहीत. नियोजनबद्ध यंत्रणेने विजय साकार केला.