मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 08:38 IST2024-11-28T05:24:45+5:302024-11-28T08:38:20+5:30
भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, शिंदेंचा दावा नाही, निर्णय मोदी-शाहांवर सोपविला, अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक, फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर, लवकरच घोषणा

Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024
मुंबई - मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल, असे विधान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परतण्याच्या मार्गावर असून दिल्लीत गुरुवारी तीन पक्षांच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत जी बैठक होईल तीत या संदर्भात अधिक स्पष्टता येईल.
शिंदे यांनी बुधवारी दुपारी अचानक ठाणे येथे पत्र परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट केले की मोदी-शाह यांचा निर्णय अंतिम असेल. आता मोदी-शाह कोणता निर्णय देतात या बाबत कमालीची उत्सुकता आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते त्यासाठी गुरुवारी दिल्लीला जाणार आहेत.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर
सध्याच्या एकूणच हालचाली बघता मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच असेल, असे मानले जाते. मात्र, ऐन वेळी दुसरेच नाव समोर येणार नाही ना, अशी शंका फडणवीस यांच्या चाहत्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर झालेला तुम्हाला दिसेल, असे भाजपच्या दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.
महायुतीत मतभेद नाहीत : फडणवीस
महायुतीत कुठलेही मतभेद नसून कुणाच्याही मनात कुठलाही संभ्रम नाही, असे फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत. एकनाथ शिंदे, अजित पवार व आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. सर्व निर्णय सोबत बसून होतील, असे आम्ही निवडणुकीच्या अगोदरच सांगितले होते.
आमचे पक्षश्रेष्ठी सोबत बसून निर्णय घेतील. कुणाच्याही मनात किंतु परंतु नाही व एकनाथ शिंदे यांनी उघड भूमिका मांडून राजकीय क्षेत्रातील काही लोकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर केले आहेत, असे फडणवीस म्हणाले. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे याबाबत विचारणा केली असता फडणवीस यांनी काहीही न बोलता केवळ हात जोडले.
सोबत बसून सगळे निर्णय होणार आहेत. कोणाच्या मनात काही किंतु परंतु असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे. पक्षश्रेष्ठींसोबत आमची बैठक होईल आणि तिथे पुढचे निर्णय होतील. महायुतीमध्ये आम्ही एकत्रित बसूनच निर्णय केले आहेत, तसेच पुढचे निर्णय होतील. - देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री.
भाजप मुख्यमंत्रिपदासाठी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराला माझा किंबहुना शिवसेना म्हणून आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही फोनवरून संवाद साधून त्यांना हे कळवले आहे. सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण किंवा नाराजीही नाही. - एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री
आज मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल. - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री
शिंदे नाराज असल्याच्या वावड्या विरोधक उठवत होते, पण शिंदे यांनी त्यावर आज सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते एक कणखर नेते असून त्यांच्यामुळे महायुती मजबूत आहे. शिंदे यांनी मांडलेली भूमिका कौतुकास्पद आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप