मुंबई - भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरलं आहे. भाजपा विधिमंडळाच्या बैठकीनंतर महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
सकाळी ११ वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक होती. या बैठकीत भाजपाचे १३२ आमदार त्याशिवाय भाजपाला पाठिंबा दिलेले ५ इतर आमदारही उपस्थित होते. बैठकीपूर्वी भाजपा नेते, आमदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या बैठकीसाठी विधानभवन फुलांनी सजवलं होते. त्याशिवाय भाजपा आमदारांनी भगवे फेटे घातले होते. या बैठकीला सुरुवात होण्याआधी नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत केले. बैठकीआधी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात प्रस्ताव कोण मांडणार, सूचक, अनुमोदक कोण असणार हे ठरवण्यात आलं. तोपर्यंत भाजपा आमदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सगळे नेते सेंट्रल हॉलमध्ये पोहचले.
या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उइके, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या प्रस्तावाला भाजपाच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.
आजचा दिवस ऐतिहासिक - बावनकुळे
आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा विजय मिळवला. राज्यात डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं. जनतेने आपल्याला भरभरून यश दिले. प्रचंड विश्वास आपल्यावर टाकला. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवारांसह महायुती नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढवली. राज्यातील १४ कोटी जनतेचे आभार मानले पाहिजे. जनतेने भाजपा आणि महायुतीवर विश्वास टाकला. आपण १४९ जागा भाजपा म्हणून लढवल्या. त्यात आतापर्यंतच्या भाजपाच्या इतिहासात १३२ जागा विजयी झाल्या. आपल्याला इतर अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. महायुतीचं संख्याबळ २३७ आहे तर भाजपाचं संख्याबळ १३२ आणि ५ इतर धरून १३७ इतके संख्याबळ आहे. राज्याचे यशस्वी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे यश फार मोठे आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिली.
भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अखेर भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुंबई, नागपूर येथील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोलताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.