"गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी केला आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:01 PM2024-11-25T14:01:27+5:302024-11-25T14:02:03+5:30
Maharashtra Assembly Election Result 2024: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे.
मुंबई - आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीकाँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक व एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ मंत्र्याची भेट घेतली असता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली होती. गैर भाजपा राज्यात निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करते पण भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोगाला काही दिसतच नाही का? हा प्रश्न आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत.
रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या काळात केली असता त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधानसभेचा निकाल लागला असला तरी निवडणूक आचारसंहिता संपण्या आधीच गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केलेले आहे, त्यांच्यावर तातडीने कारावाई झाली पाहिजे असे अतुल लोंढे म्हणाले.