Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:37 PM2024-11-23T12:37:54+5:302024-11-23T12:39:03+5:30
Vidhan Sabha Election Result 2024: निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून या निकालात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. एकट्या भाजपाने १२० हून अधिक जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३७ जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. मात्र महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव दिसून येत आहे. मात्र हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, Ballet paper (मत पत्रिका) वर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असा दावा राऊतांनी करत संपूर्ण निकालावर संशय व्यक्त केला आहे. निकालामागे खूप मोठे कारस्थान दिसतंय, हा निकाल लावून घेतलेला दिसतोय. हा लोकांनी दिलेला कौल नाही. मोदी शाहांनी यंत्रणा ताब्यात घेतली आहे असा आरोप त्यांनी केला.
Ballet paper (मत पत्रिका) वर
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2024
पुन्हा निवडणुका घ्या.
महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही!
असा निकाल लागूच शकत नाही.
काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. पण जरी हा निकाल आला असला तरी हा जनतेचा कौल आहे, असं आम्ही मानायला तयार नाही. जनतेचा कल हा नव्हता. मी १०० टक्के सांगतो, जय पराजय होत असतात. निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
#WATCH | As Mahayuti has crossed halfway mark in Maharashtra, Shiv Sena UBT leader Sanjay Raut says, "They have done some 'gadbad', they have stolen some of our seats...This cannot be the public's decision. even the public does not agree with these results. Once the results are… pic.twitter.com/Qxx6a0mKsW
— ANI (@ANI) November 23, 2024
दरम्यान, पहिल्यांदाच महाराष्ट्रात २०० च्या पार एखाद्याला बहुमत मिळालं आहे. भाजपाच्या जागा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मिळूनही जास्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है आणि विकासाचा मुद्दा यांना लोकांनी दिलेली पसंती आहे. संजय राऊत त्यासाठी भडकले आहे कारण त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सहाव्या नंबरवर फेकले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्याला जनतेने नाकारले आहे. आज तुमचा गर्वहरण केला आहे. त्यामुळे लोकशाहीत ईव्हीएमला दोष दिला होता. बंगालमध्ये आमचा पराभव होतो, तेव्हा आम्ही आत्मचिंतन केले ईव्हिएमला दोष दिला नाही असा टोला भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी संजय राऊतांना लगावला आहे.