राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महायुतीमधील घटक पक्षांवर टीका केली होती. तसेच इव्हीएमवर शंका घेतली होती. त्यानंतर आता महायुतीमधील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, असं विधान संजय गायकवाड यांनी केलं.
संजय राऊत यांनी इव्हीएमवर शंका घेत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, इव्हीएममधून आदित्य ठाकरे हेही विजयी झाले आहे. मत त्यावरही आक्षेप घेणार का? ठाकरे गटाचे लोकही निवडून आले आहेत ना? त्यांचा हा रडीचा डाव आहे. महायुतीला मिळालेला विजय हा कामाचा परिणाम आहे. लाडक्या बहिणीचा परिणाम आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना धुळ चारली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे गुजरात लॉबी ठरवेल, तसेच सरकारचा शपथविधी हा गुजरातमधील स्टेडियममध्ये घ्यावा, या संजय राऊत यांनी दिलेल्या खोचक सल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. त्या संजय राऊत यांचं कोणतंही विधान आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते वेडे आहेत. त्यांची आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. तसेच आता ते आयुष्यात कधीही खासदार सुद्धा होणार नाहीत, असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला.