Maharashtra Assembly Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले त्यात आतापर्यंत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. भाजपाच्या १२९ जागा, शिवसेनेच्या ५७ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी ३८ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १९ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या सव्वादोन वर्षांत ज्याप्रकारे काम केलं, रेकॉर्डतोड निर्णय घेतले, विकासाची कामं केली. वेगळ्या योजना आणण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालं. प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं त्याचाच हा विजय आहे," असं श्रीकांत शिंदे म्हणाले. पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
मुख्यमंत्री कोण असेल?
"मी एक साधा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. दिलेली जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करतोय." असं मुख्यमंत्री कोण होणार यावर उत्तर देताना ते म्हणाले. "एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. त्यांनी जे काम केलं. अपार कष्ट केले, जे वर्षा सर्वांसाठी बंद होतं, ते सर्वांसाठी उघडण्याचं काम केलं, रात्री अपरात्री लोकांचे प्रश्न सोडवले. १८-२० तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला पहिल्यांदा मिळाला. एकही दिवस न थकता, न दमता निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांचेही मी आभार मानतो," असं शिंदे म्हणाले.
सर्व निर्णय जनतेपर्यंत पोहोचले
"सर्व निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं कमाल केली असं म्हणू शकतो. सर्व बहिणीही महायुतीच्या भावांच्या मागे उभ्या राहिल्या. शासन आपल्या दारीलाही विसरता येणार नाही. थेट लोकांना लाभ मिळत राहण्याचं काम केलं. फेक नरेटिव्ह ऐवजी आज विकासाला मतं मिळाली," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.