Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:28 AM2024-11-23T10:28:56+5:302024-11-23T10:29:53+5:30
Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीची पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी १९४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांची आघाडी आहे तर ८६ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. या निवडणुकीत इतरांना ८ तर मनसे, वंचित बहुजन आघाडी यांना एकाही जागेवर आघाडी नाही.
महायुतीत भाजपा १०९, शिवसेना ५४ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३५ जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस २९, ठाकरे गटाला २८ आणि राष्ट्रवादीला २९ जागांवर आघाडी आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. ऐरोलीत भाजपाचे गणेश नाईक आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024
लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यात १७ खासदार महायुतीचे तर ३१ खासदार निवडून आले होते. मात्र या निकालानंतर महायुती सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा लागू केल्या. त्यात सर्वात महत्त्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. त्यात महिलांना १५०० रुपये दर महिना दिले जात होते. त्याशिवाय महिलांना एसटीत निम्मे तिकीट, भावांतर योजना या सारख्या योजनांचा फायदा महायुतीला झाल्याचं दिसून येत आहे.