मुंबई - काँग्रेसचे बडे मोहरे या निवडणुकीत गळाले. पक्षाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा दिग्गज नेत्यांना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल इथपासून ते काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी विजयी झाले आहेत.
उद्धवसेनेचे वीस जागांवर समाधान
निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा फटका बसला आहे. पक्षाने जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचल्या. तरीदेखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षाला फक्त २० जागांवर समाधान मानावे वागले आहे.
शरद पवार यांचा करिश्मा रोखला
शरद पवार यांचा करिश्मा या निवडणुकीत चालू शकला नाही, असे या निकालांवरून दिसून येते. सहजी हार न मानणारे थोरले पवार या निकालांनी चांगलेच बॅकफूटवर आल्याचे दिसते. पुतण्याच्या गटाचे आव्हान झेलत त्यांनी १० जागा मिळाल्या.
जनतेने अजित पवार यांनाही भरभरून मतांचे दान दिले आहे. लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले. अजित पवार त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची व्यूहरचना केली. गुलाबी जॅकेटवर टीका झाली. पण सगळे अंदाज खोटे ठरवत त्यांनी बाजी मारली.
तमाम बहिणींनी दिले विजयाचे गिफ्ट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला विकासकामे व उत्तम कारभारामुळे विजय मिळाला आहे. महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी असेच उत्तम काम करत राहील. महायुतीला विजयी केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे विशेषत: युवक व महिलांचे मी आभार मानतो. त्यांनी महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. ‘जय महाराष्ट्र’. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत अनपेक्षित निकाल लागले आहेत. या निकालांचे आम्ही तपशीलवार विश्लेषण करणार आहोत. झारखंडमध्ये झामुमोप्रणित आघाडीला मिळालेल्या विजयाचे आम्ही स्वागत करतो. जल, जंगल, जमीन व राज्यघटना यांच्या रक्षणासाठी झारखंडमधील जनतेने आमच्या आघाडीला कौल दिला. वायनाडमधील मतदारांनी प्रियांका गांधींवर विश्वास दर्शविला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा