मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बंपर यश मिळालं असून आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात भाजपा आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून स्पर्धा सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यातच मोदी-शाह जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. एकनाथ शिंदे यांनीही स्पष्टपणे वरिष्ठांना कळवलं आहे अशी माहिती शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक करण्यात आली आहे. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही कायदेशीर तरतूद असते. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदेंची नेमणूक केली आहे. वरिष्ठांनी बोलावल्यानंतर तिन्ही नेते दिल्लीत जातील किंवा पक्षाचे वरिष्ठ इथं येणार असतील तर इथं बैठक होईल. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. तिन्ही नेत्यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे निर्णय सोपवला आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी नवं सरकार काम करेल त्यावर तिघांचे एकमत आहे. एकनाथ शिंदे यांची बिल्कुल नाराजी नाही. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असेल हे वरिष्ठांना एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे कळवलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. येत्या काही दिवसांत नवीन सरकार स्थापन होईल. भाजपाची कदाचित उद्या गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. यानंतर तिन्ही नेते एकत्रित बसतील. चर्चा करतील. पक्षश्रेष्ठींकडे जाऊन ते जे काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापन होईल. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. परंतु जो निर्णय मोदी आणि शाह घेतील तो सर्वांना मान्य असेल असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मागणी आग्रहीपणे करण्यात येत होती. अखेरीस बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटीनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड करण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचं वृत्त दिलं असलं तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात सलग पाच वर्षे राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले होते. आता पुन्हा राज्यात फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगितले जात आहे.