मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. त्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा राज्यातील नंबर एकचा पक्ष बनला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने १०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने १३२ जागा जिंकल्या असून आता मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घ्यावे अशी मागणी भाजपा आमदारांकडून सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत आज भाजपाच्या वरिष्ठांची बैठक होणार आहे. त्यात फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी लावून धरण्यात येत आहे. मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही असं समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला आमचा पाठिंबा आहे असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम राहावे अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. भाजपाने या निवडणुकीत १३२, शिवसेनेने ५७ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत.
या आमदारांनी व्यक्त केली भावना
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची भावना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेनं भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद फडणवीसांना मिळेल. सर्व आमदारांची भावना तीव्र आहे - किशोर जोरगेवार, आमदार
आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी कधीही न मिळालेले यश मिळालं आहे. भरपूर परिश्रम आणि ताकद आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे - शिवेंद्रराजे भोसले, आमदार
माझ्यासारख्या तरुणाला बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे जनमाणसात ज्यांनी काम केले, लाडकी बहीण योजना त्यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे जनतेच्या मनातील इच्छेनुसार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला हवेत - राहुल ढिकले, आमदार
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, त्याचा आनंद भाजपा कार्यकर्त्यांसह जनतेला होईल. जनतेने मोठं बहुमत फडणवीसांना दिले आहे. १३२ जागा आणि ५ अन्य आमदार असे मिळून १३७ आमदार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाला समन्वय साधून पुढे घेऊन जाणारे देवेंद्र फडणवीस नेते आहेत त्यामुळे ते मुख्यमंत्री बनले तर आम्हाला आनंदच आहे - प्रवीण दरेकर, भाजपा आमदार
दरम्यान दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होणार असून त्या बैठकीत मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होईल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही मुख्यमंत्रिपदासाठी मागणी सुरू आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे अशी शिंदेसेनेच्या आमदारांनी आग्रह धरला आहे. परंतु दिल्लीत आजच्या बैठकीत पुढील निर्णय होणार आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत राज्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून राज्याला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.