Ajit Pawar Critisice Rohit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीला मतदारांनी भरभरुन मते दिली आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३० जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. मात्र निकाल लागून सहा दिवस उलटले तरी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशी मागणी केली होती. मात्र आता अजित पवार यांनी रोहित पवारांच्या मागणीवर खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीत महायुतीचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अशातच रोहित पवार यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू असं विधान केलं होतं. रोहित पवार यांनी केलेल्या विधानावर अजित पवार चांगलेच सुनावलं. फुकटचा सल्ला नको असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.
“मुख्यमंत्रीपद अजित पवारांना दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्हीही त्या गोष्टीचं स्वागत करू. अभिनंदन करू. पण भाजपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखत असाल तर भाजप अजित पवारांना सहजपणे मुख्यमंत्री बनवणार नाहीत”, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केलं. "बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याचे काही काम नाही. आम्ही आमचा पक्ष, आमचे सहकारी, कार्यकर्ते, आमदार सगळेच खंबीर आहेत. ज्याने त्याने आपआपलं बघावं," असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं.
प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट
दरम्यान, मंगळवारी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते. त्यावेळी रोहित पवार हे देखील तिथे उपस्थित झाले होते. या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतली. "शहाण्या...थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?," असा चिमटा यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांना काढला होता.