मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. अन्यथा आमच्याकडे पर्याय असल्याचा दावा करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपला सर्वात आधी बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे, व त्यांनी सुद्धा ते सिद्ध केले पहिजे असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी उशीर होत आहे. मात्र सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भाजपची जवाबदारी आहे की, त्यांनी सरकार स्थापन केली पाहिजे. भाजपकडे बहुमत नसेल तर, राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पर्याय आहे का ? याचे अधिकार राज्यपाल यांना आहे. मात्र तसेही काही होताना दिसत नसल्याचे राऊत म्हणाले.
सत्तास्थापनेसाठी भाजपकडे आम्ही कोणताही प्रस्ताव मागितला नसून, भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये समसमान सत्तेचा फॉर्म्युला आधीच ठरेलला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन हा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले होते. मात्र निवडणुका होताच ते पलटी मारायला लागले असतील तर आम्हीही कोणत्याही फॉर्म्युल्यासाठी लाचार नाहीत, असेही राऊत म्हणाले.
तर भाजपकडे बहुमत असले तर त्यांनी खुशाल सत्तास्थापना करावी. एवढच नाही तर भाजपने वानखेडे स्टेडियमवर नव्हेच तर चंद्रावर जाऊन स्त्तास्थापेनेचा सोहळा पार पाडवा असा खोचक टोला राऊत यांनी भाजपला लगावला. तसेच आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपला सर्वात आधी बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे. भाजपकडे ईडी,सीबीआय सारख्या यंत्रणा आहेत. याचा उपयोग करून त्यांनी बहुमत सिद्ध करायाला पाहिजे. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.