विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांना मंगळवारी जोर आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात रात्री बैठक झाली. अमित शाह यांनी कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांना कानपिचक्या दिल्या. निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली आहे. याबैठकांनंतर जागावाटपाची बैठक झाली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे.
भाजपाला १६० जागा हव्या आहेत. तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ८० जागा हव्या आहेत. परंतू, या जागा मिळत नसल्याने शिंदे आणि पवार गटात मोठी धुसफुस सुरु आहे. तर भाजपातही आपल्याला शिंदे किंवा अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असल्याने नाराजी आहे.
काल रात्री झालेल्या बैठकीनंतर शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतची बैठक सकारात्मक राहिली असल्याचे म्हटले आहे. तसेच महायुतीत लवकरच जागावाटपावर निर्णय होईल असेही म्हटले आहे. परंतू, नेमकी किती जागांवर चर्चा झाली, काय झाली हे सांगण्यास शिंदे यांनी नकार दिला. रात्री 12.30 च्या सुमारास ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. यानंतर हॉटेलमध्ये कोणताही नेत्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नव्हता.
सीएम शिंदे रात्रीच विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी विमानतळावर गाठले व बैठकीत काय झाले याची विचारणा केली. दरम्यान, अमित शहा यांनी नागपुर विभागातील विधानसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र काम करावे लागेल अशी तंबी दिली आहे. निवडणुकीच्या तयारीच्या वेळी गटबाजी आणि उमेदवारांच्या नामांकनाच्या वेळी बंडखोरी पक्ष खपवून घेणार नाही, असे ते म्हणाल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.