राजन नाईक यांनी सांगितले की निवडणुकीच्या दिवशी आचारसंहितेच्या दिवसाची माहिती द्यावी. ती माहिती मी दिली. या राड्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेऊ आणि प्रश्न विचारतील त्याची उत्तरे देऊ जनता निर्णय घेईल असे आम्ही ठरवले आणि इथे आलो, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तसेच हे पैसे माझे नाहीत असा दावाही तावडे यांनी केला आहे.
ज्या पैशांवरून राडा केला ते माझे नाहीतच. ज्या खोल्यांत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो, असे तावडे यांनी म्हटले आहे. याचबरोबर जेवढा त्यांनी दावा केला आहे तेवढे पैसे सापडले नाहीत तर मी ते ठाकुरांकडून वसूल करणार आहे, असेही तावडे यांनी म्हटले आहे.
आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले.
बविआ हा भाजपाचा मित्रपक्ष आहे. इथे सर्व्हे शून्य आहे, असे भाजपाला माहिती आहे. मला भाजपाच्याच नेत्याचा फोन आला की तावडे ५ कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी येत आहेत. मी त्यांना म्हटले एवढा मोठा नेता असे करणार नाही. परंतू, तावडे आले, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. या मिटींगला २०० लोक जमले होते, त्याना त्या पैशांचे वाटप झाले असेल आणि ते निघून गेले असतील असे ठाकूर म्हणाले. पत्रकार परिषदेनंतर तावडे आणि ठाकूर हे दोघेही एकाच कारमधून निघून गेले. यामुळे या प्रकरणावर एकंदरीतच जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.