...त्यामुळे महाराष्ट्राची ‘जीएसटी’ बाबतची भूमिका मांडली जात नाही; शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:11 PM2024-11-05T23:11:00+5:302024-11-05T23:11:20+5:30
बारामती व्यापारी महासंघ आणि दि मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : आजच्या कार्यक्रमात काहीजणांनी ‘जीएसटी’ बाबत प्रश्न मांडले.मात्र, ‘जीएसटी’हा प्रश्न केवळ महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही.संपूर्ण देशापुरता हा प्रश्न मर्यादित आहे. त्यासाठी ‘जीएसटी कौन्सिल’ ही वेगळी संस्था देशात कार्यरत आहे.या संस`थेचे प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री हे त्याचे ‘कंपल्सरी’ सभासद आहेत. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या ऐवजी इतर मंत्री,वरीष्ठ अधिकारी.अर्थ खात्याच्या सचिवांना याबाबत मत मांडण्याचा अधिकार नाही.दुर्दैवाने महाराष्ट्राचे अर्थमंत्री या संस`थेच्या बैठकीला सतत गैरहजर राहिले.त्यामुळे महाराष्ट्राची ‘जीएसटी’ बाबतची भूमिका मांडली जात नाही,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याच्या कारभारावर निशाणा साधला.
बारामती व्यापारी महासंघ आणि दि मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले,केंद्रातील अर्थमंत्री आणि त्यांच्यापेक्षा वरीष्ठ मंत्र्यांशी आम्ही लोकांनी हा प्रश्न मांडला.यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले.तुमचे लोक हजर राहत नाहीत,याचा अर्थ तुम्हाला या प्रश्नावर आस`था आहे,असे आम्ही मानत नाही.त्यामुळे या बाबत अधिक भाष्य करणे याेग्य नाही,असा टोला ज्येष्ठ नेते पवार यांनी उपमुख्यमंत्री यांना लगावला.
पवार म्हणाले,केंद्र सरकारची काही धोरणे अजिबात पटत नाहीत.सरकारने तीन-चार राज्यांचा साखर निर्यातीचा कोटा कमी केला आहे.त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.एकीकडे राज्यात साखरेच्या पोत्यांची थप्पी लागली आहे,देशात साखरेच्या किंमती पडतील का अशी शंका आहे. त्यामुळे साखर निर्यात करण्याशिवाय पर्याय नाही.त्यामुळे साखरेवरील निर्यात बंदी हा न्याय नाही अन्याय आहे.निवडणूक संपल्यावर याबाबत आम्ही ‘पार्लमेंट’ मध्ये भांडणार असल्याचे पवार म्हणाले.
चार दिवसांपूर्वी देशात राज्यांचे ‘रँकिंग’ करण्यात आले. मी राज्याचा प्रमुख असेपर्यंत महाराष्ट्र राज्य क्रमांक ‘एक’वर होते,आम्ही एक नंबर कधी सोडला नाही.उद्योग उभारण्यात आमची स्पर्धा गुजरात बरोबर होती,ती स्पर्धा विकासाची होती. मात्र आता सध्या चित्र बदलले आहे.राज्यातील उद्योग दुसरीकडे जायला लागले आहेत.टाटांचा एअरबस चा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय झाला होता.मात्र, केंद्रात मोदींचे सरकार आले,त्यांनी टाटांना बोलावले.त्यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही.पण महाराष्ष्ट्रात होणारा टाटांचा प्रकल्प गुजरात मध्ये नेण्यात आला.मला खात्री आहे,याबाबत मोदी साहेबांचे पंतप्रधानपद प्रकल्प हलविण्यास उपयोगी पडले. तसेच तळेगांव मध्ये होणार्या ‘वेदांता’ प्रकल्प देखील गुजरातला हलवणे बाबत दिल्लीवरून हुकूम केला.आम्ही गुजरात विरोधी नाही. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एक होते, गुजरात हे महाराष्ट्राचा भाऊ आहे.मात्र आमच्या ताटातले घेऊ नका,एवढेच आमचे म्हणणे आहे.परिणामी राज्य राज्यात गैरसमज होतील,अशी आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण झाले.कार्यक्रमासाठी युगेंद्र पवार आणि व्यापारी महासंघ,मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.