गेल्या तीन दिवसांपासून निवडणूक आयोगाचे अधिकारी उद्धव ठाकरेंच्या बॅगा, हेलिकॉप्टर आणि कार तपासत आहेत. यामुळे ठाकरेंनी व्हिडीओ शूट करून त्यांना विचारणा करताच आज उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली. यावरून राजकारण रंगले आहे.
आज गोव्यावरून सावंतवाडी, कणकवलीत येत असताना चेकपोस्टवर ठाकरेंची गाडी तपासण्यात आली, यावर एका पत्रकाराने दौऱ्याची सुरुवात कशी झाली असा प्रश्न ठाकरेंना विचारला. याला ठाकरेंनी दोन शब्दांत उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे हे आमदार वैभव नाईकांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. येथून ते कणकवलीतील सभास्थळी रवाना झाले. त्यापूर्वी नाईकांच्या घरातून बाहेर पडत असताना गोवा-महाराष्ट्र सीमेवरील चेकपोस्टवर कार तपासल्याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. दौऱ्याची सुरुवात कशी झाली असे विचारताच ठाकरेंनी ''छान उत्तम'' असे उत्तर दिले.
बांदा चेकपोस्टवर काय घडले...सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोवा येथील मोपा विमानतळ उतरून उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतना बांदा येथील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या थांबवून तपासणी करण्यात आली होती. यावेळी ठाकरेंनी काहीही आडकाठी न करता कार तपासणी करू दिली.