उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 01:39 PM2024-08-15T13:39:10+5:302024-08-15T13:39:54+5:30

मविआ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढणार, मविआच्या प्रचाराची धुरा ठाकरेंकडे असेल मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय निकालानंतर होईल असं सांगितले जात आहे. 

Maharashtra Assembly Election - Uddhav Thackeray will be the campaign head of Mahavikas Aghadi and the decision of CM will be made only after the results | उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मविआ निवडणूक लढणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख उद्धव ठाकरे असतील असं सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम त्यामुळे त्यांच्यात हाती मविआच्या प्रचाराची धुरा असावी असं अनेकांचे मत आहे. मात्र मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावर मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवलं जाईल असंही सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जावं यासाठी ठाकरे गट आग्रही होता. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ३ दिवसीय दिल्ली दौरा झाला. त्यात काँग्रेसच्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना मविआचा चेहरा बनवावा असं संजय राऊत सातत्याने सांगत आहेत. मात्र काँग्रेसनं त्यास नकार दिला. परंतु महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वावर अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जो प्रचार निवडणुकीत केला जाईल त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे असावेत असं काँग्रेस नेत्यांना वाटते. 

त्याचसोबत महाविकास आघाडीचा एक समान जाहिरनामा तयार करण्यात येत आहे. त्याची विशेष जबाबदारी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी घ्यावी. मविआच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात काँग्रेस तयार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय असेल तो निवडणूक निकालानंतरच घेतला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट केले आहे. १६ तारखेला मुंबईत महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होत आहे त्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे नेतृत्व करतील याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. 

ठाकरे गटाची 'ती' मागणी अमान्य?

मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत जाऊन शिक्कामोर्तब करून घ्यावं याची गरज का वाटली?. लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची समाधानकारक कामगिरी नव्हती. त्यांचेही समाधान झाले नसेल. जेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा काँग्रेसनं महाराष्ट्रच नाही तर इतर ठिकाणीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नाही. ही परंपरा नाही. निवडणूक झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष जो असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते सरकारच्या स्थैर्यासाठी महत्त्वाचा असतो. यावेळी बदल करायचं काही कारण वाटत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतची मागणी काँग्रेस पक्षात कुणी मान्य करणार नाही. त्याने आम्हाला काय फायदा मिळेल असं वाटत नाही. जो काही सहानुभूतीचा विषय होता तो आता संपला आहे असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंच्या चेहरा मविआकडून मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्यावर स्पष्ट मत व्यक्त केले होते. 

 

Web Title: Maharashtra Assembly Election - Uddhav Thackeray will be the campaign head of Mahavikas Aghadi and the decision of CM will be made only after the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.