महाविकास आघाडीत काँग्रेसला जास्त जागा मिळणार?; कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:39 AM2024-09-02T10:39:24+5:302024-09-02T10:40:49+5:30
विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात जास्तीत जागा मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडी, महायुतीत पक्षांची रस्सीखेच चालली आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती असो महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्यात. त्यात महाविकास आघाडीतकाँग्रेसनं जास्त जागा लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आम्हाला हे सरकार घालवायचं आहे. लोकांना चांगले सरकार द्यायचं आहे असं सांगत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर घणाघात केला.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, जागावाटपाबाबत आमच्या ३ बैठका झाल्या आहेत. या महिन्यात बैठका संपतील. सप्टेंबर अखेरपर्यंत जागावाटपाचा तिढा कुठल्याही स्थितीत सुटावा यादृष्टीने आमचे काम सुरू झाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसनं जास्त जागा लढाव्यात ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आलेल्या सर्व्हेतून ते दिसते. आघाडी धर्म असल्याने यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय जागांबाबत कार्यकर्त्यांचा दावा आहे. लोकांचाही कौल काँग्रेसच्या बाजूने आहे. आम्हाला महापापी सरकार गाडायचं आहे. जागावाटपाचा जो काही तिढा आहे तो आम्ही समन्वयाने सोडवू. या महाराष्ट्रात आपलं सरकार आलं पाहिजे. हे सरकार गेले पाहिजे. लोकांना चांगले सरकार दिले पाहिजे या भूमिकेतून आम्ही प्रयत्न करू अशी भूमिकाही वडेट्टीवारांनी मांडली.
दरम्यान, महाराष्ट्रात जे वातावरण आहे, लोकांच्या मनात वेदना आहेत. संतापाची चीड आहे. या सर्वात महाविकास आघाडी विरोधक म्हणून महिलांचे शोषण होत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर आम्ही शांत बसायचं का? आम्ही डोळे बंद करून यांचे सर्व पाप सहन करायचे का? हे जेवढे राज्यातील उद्ध्वस्त करतील ते आम्ही बघत बसायचे का? सरकार म्हणून सामान्य माणसांवर कुठेही अन्याय होणार नाही. महिलांचे शोषण होणार नाही. राज्यातील, देशातील महापुरुषांचा अपमान होणार नाही ही त्यांची जबाबदारी आहे. या सरकारच्या नाकर्तेपणासाठी आम्ही आंदोलन करतोय. भाजपा स्वत:चं पाप लपवण्यासाठी आंदोलन करतायेत. आम्ही यांचे पाप उघडं करण्यासाठी पुन्हा आंदोलन करतोय असं सांगत विजय वडेट्टीवारांनी महायुतीवर निशाणा साधला.