महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा पारा जसजसा वर जात आहे, तस-तसे नेते मंडळींचे एकमांवरील आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहेत. यातच आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपति संभाजीनगरमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या वक्तव्यावरून भाष्य केले आहे. ते म्हणाले जर न्याय असेल तर भारत सुरक्षित आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच धुळ्यातील प्रचार सभेला संबोधित करताना 'एक हैं तो सेफ' अशी घोषणा केली होती.
काय म्हणाले ओवेसी -ओवेसी म्हणाले, "मजलिस म्हणत आहे की, 'हम अनेक हैं तो अखंड हैं'. मोदींची एक करायची इच्छा आहे. RSS ची एक करण्याची इच्छा आहे. मी म्हणतो, 'इंसाफ है तो इंडिया सेफ है', 'संविधान है तो सम्मान है', 'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या मनाने माणणारे असतील, तर प्रेम आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय करत आहेत. तर मोदी एक काम करत आहेत,मराठा विरुद्ध ओबीसी करत आहेत. हे एक होण्यासंदर्भात बोलत आहेत आणि आम्ही अनेकांसंदर्भात बोलत आहोत. यांची एकीच्या नावावर सर्वांनमध्ये भांडण लावण्याची इच्छा आहे."
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?मोदी म्हणाले होते, "आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूट काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपावी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे तुकडे झाले. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे 'एक हैं तो सेफ हैं'. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे."