सध्या महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती कंबर कसून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी इतर पक्षांच्या तुलनेत अत्यंत वाईट होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे.
या सर्वेक्षणात राज्यात महायुती आणि राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या 23 जागा मिळू शकतात. तर 16 जागांवर अजित पवार गटाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, अजित पवार 2023 मध्ये शरद पवार यांची साथ सोडून 40 आमदारांसोबत बाहेर पडले होते.
70 जागांवर केले सर्व्हेक्षण -याशिवाय 31 विधानसभा मतदारसंघ असे आहेत, जेथे पक्षाची स्थिती प्रतिकूल आहे. या 31 पैकी 21 विधानसभा जागांवर विजय मिळवण्यासाठी पक्षाला मित्रपक्षांची मदत अत्यंत आवश्यक आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मते राष्ट्रवादीकडे वळाल्यास, अजित पवार गट 21 जागा जिंकू शकेल. तर 10 जागांवर एनसीपी आपल्या विरोधकांच्या तुलनेत कमकुवत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, अजित पवारांच्या एनसीपीने 70 जागा मागितल्या आहेत. यामुळे पक्षाने याच 70 जागांवर सर्व्हे केला आहे.
यापूर्वी आपल्याला केवळ 6 जागांवर आघाडी मिळाली होती, मात्र आता... -या सर्वेक्षणासंदर्भात बोलताना, राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे की, यापूर्वी आपल्याला केवळ 6 जागांवर आघाडी मिळाली होती, मात्र आता हा आकडा 23 वर पोहोचला आहे. अर्थात आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत 23 जागा सहज जिंकू शकतो. तर 16 जागांवर अधिक मेहनत करावी लागेल, शिवसेना आणि भाजपच्या पाठिंब्याने आपण उर्वरित जागा देखील जिंकू शकतो.