राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. प्रचारात घनघोर तोफा धडाडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला. प्रचारात आश्वासनांचा पाऊस तर पडलाच पण वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे प्रचाराचा फोकस बदलत राहिल्याचे दिसले. प्रामुख्याने मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाल्याचे प्रचारातील गाजलेल्या मुद्द्यांवरून दिसून येते. त्याचप्रमाणे लाडकी बहीण, बेरोजगारी, शेतकरी व इतर योजनांवर प्रामुख्याने प्रचारात भर देण्यात आला.
आश्वासने
महायुती - महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात जी प्रमुख आश्वासने दिली ती प्रचारात सातत्याने कायम ठेवली. त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार निर्मिती करणार, पेन्शनधारकांना महिन्याला १५०० वरून २१०० देणार आदी मुद्द्यांचा समावेश होता.
मविआ - महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा ३००० रुपये, महिलांना बसप्रवास मोफत, बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपये भत्ता, सत्तेत येताच शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंत कर्ज माफ, जातनिहाय जनगणना, जनतेला २५ लाखांपर्यंतचा विमा आणि मोफत औषधे देणार. पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पाच वर्षांसाठी स्थिर ठेवणार, अशी आश्वासने मविआने दिली.
संविधान
महायुती - लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेल्या संविधानाची प्रत दाखवल्याबद्दल भाजपने राहुल गांधींवर टीका केली. ते अर्बन नक्षलवादाच्या आहारी गेल्याचा आरोप केला. तर राहुल गांधींनी दाखवलेली प्रत आतून कोरी होती, असा आरोप भाजपचे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी केला. तसेच, लोकसभेत गाजलेला संविधान बदलाचा मुद्दा विधानसभा प्रचारातही काही प्रमाणात चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणीही माईचा लाल आला तरी संविधान बदलू शकत नाही, असा पुनरुच्चार केला.
मविआ - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल मुखपृष्ठाच्या संविधानाची प्रत देतानाचे जुने छायाचित्र ट्विट केले आणि यावर भाजप नेत्यांचे काय मत आहे, असे विचारले. राहुल गांधी यांनीही यासंदर्भात ट्वीट करीत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर १४ नोव्हेंबरच्या सभेत राहुल यांनी संविधानाची प्रत आतून उघडून दाखवत त्यातील पाने कोरी नसल्याचे दाखवले. भाजपला संविधान बदलायचे होते, मात्र आम्ही लोकसभेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला, असे शरद पवार यांनी म्हटले.
‘बटेंगे तो कटेंगे’
महायुती - ‘बटेंगे तो कटेंगे’ हा उत्तर प्रदेशातील नारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात आणला. अजित पवार गटाने त्य़ाचा जोरदार विरोध केला. फुले-आंबेडकर-शाहूंच्या पुरोगामी महाराष्ट्रात या घोषणेला थारा दिला जाऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडली, खुद्द भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेसमधून याचवर्षी भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘हा नारा अजित पवारांना नीट समजलेला नाही,’ असे म्हटले.
मविआ - ‘बटेंगे तो कटेंगे’ला प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र के लुटेंगे और दोस्तों मे बाटेंगे’ अशी महायुतीची योजना असल्याचे म्हटले. ‘डर गये तो मर गये’ असा नारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ हे चालणार नाही, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते राज बब्बर यांनी म्हटले. ‘जुडेंगे तो जितेंगे’, ‘पढेंगे तो बढेंगे’ अशा आणखी काही घोषणा काँग्रेसच्या वतीने देण्यात आल्या तर ‘बचेंगे तो और लडेंगे’ असा नारा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला. '
‘एक हैं तो सेफ हैं’
महायुती - काँग्रेस पक्ष जाती-जातींत भांडणे लावत असल्याचा आरोप करीत ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील आपल्या पहिल्याच प्रचार सभेत दिला. त्यानंतर त्यांनी प्रत्येक सभेत ही घोषणा दिली. भाजपचे इतर नेतेही ही घोषणा द्यायला लागले. भाजपने तर या घोषणेच्या ठळक जाहिराती देखील दिल्या. परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुन्हा म्हटले की, ‘एक हैं तो सेफ हैं’ हा विचार मी ठेवला आणि तो महाराष्ट्रातील लोकांनी उचलून धरला.
मविआ - ‘एक हैं तो सेफ हैं’ या नाऱ्याला ‘हम सब नेक हैं’ असे प्रत्युत्तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी आलेल्या प्रियांका गांधी यांनी या राज्यात शेतकऱ्यांचा शेतमाल, नोकऱ्या, बहिणी अन् मुली, आदिवासींची जमीन, उद्योग धंदे यापैकी काहीही सेफ नसल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी ‘मन की बात, अब ज़ुबान पर!’ असे कॅप्शन देत मोदी, शाह यांच्यासह पाच जणांचे फोटो ट्विट केले. सामान्य माणूस कधी सेफ होणार असा प्रश्न विचारताना राहुल यांनी ‘बुच है तो सिंडिकेट सेफ है’ अशी टीका केली.
‘व्होट जिहाद’
महायुती - शेवटच्या टप्प्यात भाजपच्या प्रचारात ‘व्होट जिहाद’चा मुद्दा आला. धुळ्यातील मालेगावात ‘व्होट जिहाद’मुळे महायुती उमेदवारास तेथे पराभव पत्करावा लागला. व्होट जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी मतांचे धर्मयुद्ध लढावे लागेलच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इस्लामिक स्कॉलर मौलाना सज्जाद नोमानी यांचा मविआ उमेदवारांना मतदान करण्यासाठी मुस्लीम समुदायाला सांगू, असे बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् या मुद्द्याला अधिक धार चढली.
मविआ - ‘व्होट जिहाद’च्या मुद्द्याला मविआ नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पुण्याच्या विशिष्ट मतदारसंघातील काही मतदार भाजपला मतदान करतात, मग त्य़ालाही ‘व्होट जिहाद’ म्हणायचे का, असा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला. उलेमांचा पूर्वी भाजपला पाठिंबा होता, मग तोही ‘व्होट जिहाद’ होता का असे काँग्रेस नेते पवन खेडा यांनी विचारले. भाजपला हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मुख्यमंत्रिपद
महायुती - प्रचारात भावी मुख्यमंत्री कोण, हा मुद्दा चर्चिला गेला. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे स्पष्ट केले. खुद्द एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले. अजित पवार यांनी भाजपचीच री ओढली. एका सभेत अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील, असे संकेत दिले. फडणवीस यांनी मात्र एका मुलाखतीत आपण शर्यतीतच नाही, असे म्हटले तर नितीन गडकरी यांनी मला कुणी मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही, असे सांगून टाकले.
मविआ - मविआच्या घटक पक्षांतही भावी मुख्यमंत्री हा मुद्दा चर्चेला आला. निवडणूक बिगुल वाजण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, असा आग्रह केला होता. मात्र, नंतरच्या संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत निवडणुकीनंतर ठरवू, असे जाहीर झाले. प्रचारादरम्यान शरद पवार यांनी राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री बघायची इच्छा आहे, असे विधान केले. त्यावरून सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, सुप्रिया यांनी मी स्पर्धेत नसल्याचे सांगितले. तर सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही, असे पवार म्हणाले.
महायुती - प्रचाराच्या उत्तरार्धात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फोकस आला. सोयाबीन उत्पादकांना संकटातून काढण्यासाठी महायुती सरकारने पाच हजारांची स्वतंत्र मदत दिली. आता सोयाबीनला ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर देणार, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी विदर्भातील सभेत केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही भावांतर योजना, कर्जमाफी योजना, शेतकरी सन्मान योजना रकमेत वाढ असे मुद्दे मांडले.
मविआ - सोयाबीनची खरेदी ७ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने करणार, बोनस देणार आणि कांद्याचा हमीभाव निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करणार आणि कापसालादेखील योग्य हमीभाव देणार, अशा घोषणा खासदार राहुल गांधी यांनी केल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनीही आपापल्या प्रचारसभांमध्ये या घोषणांवर भर दिला. यासोबतच जाहीरनाम्यांतील कजर्माफी आणि इतर आश्वासनांचाही सभांमधून पुनरुच्चार करण्यात आला.
बॅग तपासणीचा गाजला मुद्दा...
प्रचारात नेत्यांच्या बॅग तपासणीचा मुद्दा चांगलाच गाजला. सर्वात आधी उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यात आल्या. त्यांनी त्याचा व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर शेअर केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याच्या बॅग व हेलिकॉप्टरची तपासणी झाली. त्यानंतर नेत्यांच्या बॅग तपासणाचा सिलसिलाच सुरू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आदी नेत्यांच्या बॅग तपासण्यात आल्या.