'गेली शिवशाही, आली गुंडशाही', 'शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी' सरकारविरोधात विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:02 AM2024-02-27T11:02:42+5:302024-02-27T11:04:47+5:30
Maharashtra assembly Interim Budget session 2024: महाविकास आघाडीने विधी मंडळाच्या पायऱ्यांवर 'गेली शिवशाही, आली गुंडशाही' 'तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार' 'शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी' अश्या घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
मुंबई - राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले. महाविकास आघाडीने विधी मंडळाच्या पायऱ्यांवर 'गेली शिवशाही, आली गुंडशाही' 'तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार' 'शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी' अश्या घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विरोधकांनी याप्रसंगी आज का राज गुंडाराज, गुंडांना पोसणाऱ्या, राजकीय आश्रय देणाऱ्या, वर्षावर गुंडांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.
विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेरत विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, माधवराव पाटील जवळगावकर, जयश्री जाधव, बळवंत वानखेडे, संजय जगताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन अहिर,नरेंद्र दराडे,वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.