मुंबईः विधीमंडळाच्या अधिनेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अधिवेशनात गैरहजर राहिले. पण, अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला.
'मुख्यमंत्र्यांच सभागृहावर नियंत्रण'आज संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, 'अधिवेशन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री आहेत जिथूनच अधिवेशन नियंत्रित करत आहेत, त्यांचे सभागृहाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष आहे. ते सरकारच्या कामकाजातही सहभागी होत आहेत',अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.
'विद्वतेचे अजीर्ण होऊ नये...'विधानसभा अध्यक्षाच्या निवडीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून निशाणा साधला. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केले. 'राज्यपाल हुशार आहेत, विद्वान आहेत. पण अभ्यास आणि विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचे आरोग्य खाते उपचार करायला सक्षम आहे,' असा खोचक टोला संजय राऊत यांनी मारला.