ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू आरोप प्रत्यारोप आणि शाब्दीक चकमक दिसून आली. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन यांसारख्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान, यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत स्टोरी रचून हे करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली.
"सरकारनं आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून १२ आमदारांचं निलंबन केलं आहे. ओबीसी आरक्षणाकरिता १२ काय १०६ आमदारांचं निलंबन केलं तरी आम्ही संघर्ष करतच राहू. जोपर्यंत ओबीसी आरक्षण परत येत नाही तोवर भाजप संघर्ष करत राहिल. एक वर्ष नाही पाचही वर्ष सदस्यपद रद्द झालं तरी पर्वा करत नाही. यापूर्वीही अनेकदा लोकं मंचावर आले. परंतु त्यांचं निलंबन करण्यात आलेलं नाही. अनेकदा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते. पण कोणाचं निलंबन होत नाही. माझ्यावर हक्कभंग आणला तरी पर्वा नाही. इथे स्टोरी तयार करण्यात आली. एकाही भाजरच्या सदस्यानं शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांनी पाहिलं आहे," अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
"शिवसेनेच्या सदस्यांनी तिथे येऊन धक्काबुक्की केली. त्यानंतर भाजपचे सदस्य आक्रमक झाले. परंतु आम्ही त्यांना बाजूला केले. जे काही झालं त्याबद्दल आशिष शेलारांनी माफी मागितली. त्यांनी भास्कर जाधव यांनी सर्वांची गळाभेट घेतली. परंतु काही वेळानं सरकारच्या मंत्र्यांनी एकत्र येऊन आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी स्टोरी तयार केली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात हे सरकार फेल झालं आहे," असंही ते म्हणाले.
या आमदारांचं झालं निलंबन१. संजय कुटे२. आशिष शेलार३. गिरीश महाजन४. पराग अळवणी५. राम सातपुते६. अतुल भातखळकर७. जयकुमार रावल८. हरीश पिंपळे९. योगेश सागर१०. नारायण कुचे११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया१२. अभिमन्यू पवार