सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी महायुती सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पामधून महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकीकडे महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. तर दुसरीकडे या योजनेवरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.
दरम्यान, या योजनेंतर्गत महिलांना दरमहा ५ हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्याला आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी टोला लगावला आहे. ‘’विरोधक महिलांना दरमहा ५ हजार द्या म्हणतात, तुम्ही दमडी तरी दिली होती का?’’, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजनेवर चर्चा करताना काही जणांनी सांगितलं की, दीड हजार कसले देता पाच हजार रुपये द्या. तुम्ही तर दमडा दिला नाही आणि कुठे पाच हजार रुपये देण्याची मागणी करताय? शेवटी आपल्या खिशामध्ये किती आहे ते पाहूनच ओवाळणी टाकावी लागते. खिसा मोकळा असला तर फाटक्या खिशातून काही दमडी देता येईल का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
अजित पुढे पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून म्हणाले की, बाबा तुम्ही सांगितलं की, आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही एक लाख रुपये देणार होतो. एक लाख म्हणजे महिन्याला साडे आठ हजार रुपये. आम्ही महिन्याला दीड आणि वर्षाला १८ हजार देतोय, त्यासाठी आपल्याला ४६ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकूण अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत. आता पृथ्वीराज चव्हाण हे आम्ही सत्तेवर आलो तर एक लाख रुपये देऊ असं सांगताहेत. आता असे दरवर्षी एक लाख रुपये द्यायचे म्हटले तर अडीच लाख कोटी रुपये लागतील. आपलं बजेट किती, काहीतरी लोकांना पटेल, असं सांगा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.