"अदानीपासून मुंबईला वाचवा, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 02:15 PM2024-07-04T14:15:56+5:302024-07-04T14:16:35+5:30
Maharashtra Assembly Session 2024: राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा, असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
मुंबई - राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा, असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. अदानी पूर्ण मुंबई साफ करत आहेत. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, कुर्ला येथील दुग्ध शाळेची जमीन साडे आठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ रोजी एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरीत केली गेली. हे हस्तांतरण एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी असा सवाल त्यांनी केला. सदर जमिनीचे मूल्यांकन किती आहे? जमिनीवरील एफएसआय चे मुल्याकंन किती होते? किंमत वीस हजार कोटी रुपये होते तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे. यावरही विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला.
हस्तांतरणासंदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काय शिफारशी केल्या होत्या. तुकाराम मुंडे यांनी दिलेली नोट अनुकूल नव्हती म्हणून त्यांची बदली करण्यात आली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सभागृहाला याबाबतची माहिती देण्याची त्यांनी मागणी केली.