काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर विनायक दामोदर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले. सावरकरांच्या विषयासंदर्भात बोललेलं काहीही रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही, असे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानं विरोधक आक्रमक झाले. ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. याच मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूबही करावं लागलं.
झारखंडमधील सभेतील 'रेप इन इंडिया' या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपासह तमाम सावरकरप्रेमींकडून होत आहे. मात्र, 'माफी मागायला माझे नाव काही राहुल सावरकर नाही', असं म्हणत राहुल गांधींनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यावरून, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. विशेषतः, भाजपाचे नेते या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सावरकर अपमानाच्या विषयावरून गदारोळ होण्याची चिन्हं होतीच. हाच मुद्दा घेऊन विरोधकांनी मुख्यमंत्र्याच्या चहापानावर बहिष्कारही टाकला होता. त्याचाच पुढचा प्रयोग आज विधानसभेत पाहायला मिळाला.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे 'वंदे मातरम्'ने झाली. त्यानंतर लगेचच, देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली. परंतु, संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन आणि देशाचे सरन्यायाधीश झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर आपले मुद्दे मांडण्याची सूचना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हा प्रस्ताव एकमताने संमतही करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत, काँग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु, हे बोलणं रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा, नाना पटोले यांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.
त्यानंतर, कामकाज पुन्हा सुरू होताच, देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुद्दा लावून धरला. सावरकरांविषयी बोललेलं रेकॉर्डवर घेतलं जाणार नसेल तर त्यांच्याबद्दल कुठे बोलायचं? ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची विधानसभा आहे?, असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यानंतरही विधानसभाध्यक्षांनी पुढचं कामकाज पुकारल्यानं विरोधी आमदार हौद्यात उतरले आणि 'दादागिरी नही चलेगी'च्या घोषणांनी सभागृह दणाणलं.
तत्पूर्वी, राहुल गांधींच्या विधानाबद्दल भाजपाच्या आमदारांनी विधानभवाच्या पायऱ्यांवरही निषेध नोंदवला. 'मी पण सावरकर' असं लिहिलेली टोपी घालूनच ते विधिमंडळात आले होते. माफी मांगो, माफी मांगो... राहुल गांधी माफी मांगो... अशा घोषणा त्यांनी दिल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्याः
भाजपाचं ठरलं ! विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर
राहुल गांधींना न्यायालयात खेचणार - रणजीत सावरकर
राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक
'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला