मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र या अधिवेशनाची तारीख आता बदलण्यात आली आहे. हे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते ते आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन जे 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते. ते केवळ हैदराबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आले आहे. भाजपने स्वतःला सर्वशक्तिमान आणि संविधानापेक्षा अधिक शक्तिशाली समजण्यास सुरुवात केल्याचे हे लक्षण आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभेचे विशेष अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या नावाची चर्चाआता विधानसभेचे अधिवेशन 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आले आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचेही नाव चर्चेत आहे. आता यापैकी कुणाची निवड विधानसभा अध्यक्षपदी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.