Maharashtra Assembly Speaker Election: महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार; विधानसभाध्यक्ष पदाचा उमेदवार उद्या समजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:29 PM2021-12-26T17:29:57+5:302021-12-26T17:30:24+5:30
Maharashtra Assembly Speaker Election: विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापासून रिक्त आहे. कोरोना संकटामुळे उशीर झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
राज्यातील हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. येत्या 28 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. यामुळे काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे समजते आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी दोनदा पत्र पाठवले होते. त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटून निवडणुकीची माहिती देणार आहोत. त्यावर राज्यपालांनी आता निर्णय घेतला पाहिजे. सरकार वेगळ्या पक्षांचे आहे म्हणून ते विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रोखणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. तसेच अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल त्याबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी निर्णय घेतील. काँग्रेस उद्या उमेदवार घोषित करेल, असे म्हटले आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापासून रिक्त आहे. कोरोना संकटामुळे उशीर झाला आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षाची निवड होते, तीच पद्धत आम्ही अवलंबली आहे. लोकसभेत आवाजी मतदानाने निवडणूक होते. राज्यात 1960पासून अध्यक्ष निवडीचा एकच नियम होता. आम्ही हा नियम बदलला आहे. लोकसभेलाच आम्ही फॉलो करत आहोत. राज्यपाल त्याला मान्यता देतील अशी आशा आहे, असेही थोरात म्हणाले.
महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे देखील असणार आहेत. राज्यपालांना भेटल्यावर विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतही त्यांना विनंती करणार आहोत, असे थोरात म्हणाले आहेत.