“संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”: राहुल नार्वेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:21 PM2023-10-17T13:21:42+5:302023-10-17T13:22:25+5:30
Rahul Narvekar Replied Sanjay Raut: संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकरांनी दिले.
Rahul Narvekar Replied Sanjay Raut: शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मागील सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले होते. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर घणाघाती टीका केली होती. याला आता राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
हे सरकार संविधानविरोधी, बेकायदेशीर आहे. चोर, लफंग्याचे सरकार चालवतायेत आणि त्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशात आणि राज्यात काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. वारंवार राहुल नार्वेकर विधानसभेचे अधिकारी, विधिमंडळाचे सार्वभौमत्व हे सांगताय, याचा अर्थ असा नाही की चोरी करून एखाद्याने दुसऱ्याच्या घरात शिरावे आणि त्या घरातील मालकाने त्या चोराला, खून्याला संरक्षण द्यावे अशी सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही. शिवसेनेचे ४० आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार हे मूळ घरातील चोरी, लूट करून गेलेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकरांचे नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदले जाईल. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनंतर राहुल नार्वेकर हे नाव उद्या जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल. या राज्यातील जनता माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यांना फासावर लटकवायचे आदेश दिल्लीतून आले आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का?
बिनबुडाचे आरोप ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला हवे तसे घडवून घ्यावे, याच हेतूने केले जातात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय, असे मला वाटते. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावे? आणि त्यांना का महत्त्व द्यावे? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावे. संजय राऊत यांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची त्यांना माहिती असती, तर असे वक्तव्य केले नसते. आपल्याला सांगितल्याप्रमाणे संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले.
दरम्यान, सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की, नेमके नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झाले आहे, ते जर समजले नाही, तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल? त्यामुळे सुनावणीनंतर जास्त स्पष्टता प्राप्त होईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच जे वेळापत्रक बनवले होते, त्यात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नव्हती. परंतु, केवळ हेतूपुरस्पर एकूण दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी जर का असे आरोप केले जात असतील, तर या आरोपांचा दखल घेत नाही आणि घ्यायची गरजही नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.